बारसू रिफायनरी : 201 आंदोलक पोलिसांच्या ताब्यात, तर पालकमंत्री उदय सामंत यांची आज आढावा बैठक

 


दैनिक_लोकशाही_मतदार

राजापूर :- राजापूर इथे बारसू रिफायनरी विरोधात स्थानिकांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनातील 201 आंदोलकांना शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बारसू इथे रिफायनरी प्रकल्पासाठी सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आलीय.त्याच्याविरोधात स्थानिक आक्रमक झाले असून रिफायनरी रद्द करा अशी मागणी त्यांनी केलीय. दरम्यान, राजापूर येथील रिफायनरी विरोधी आंदोलनात 201 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यामध्ये 164 महिला आणि 37 पुरुषांचा समावेश आहे. या सर्वांना आज राजापूरच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.


आंदोलकांची धरपकड सुरू असताना राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत हे बारसू रिफायनरीसंदर्भात आज आढावा घेणार आहेत. याबाबत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. दुपारी दोन वाजता या बैठकीचे आय़ोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी जिल्हा प्रशासन, एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित असतील.


बारसू रिफायनरी सर्वेक्षणाचे काम कुठंपर्यंत आलं आहे याचाही आढावा उदय सामंत घेणार आहेत.मंत्री उदय सामंत रत्नागिरी दौऱ्यात राजापूर तालुक्यातील बारसू येथील ग्रीन रिफायनरी प्रकल्पग्रस्त स्थानिक गावकऱ्यांची भेट घेणार आहेत. या भेटी दरम्यान स्थानिक आंदोलनकर्ते यांनाही भेटीचे निमंत्रण देण्यात आलंय. आता यात काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


रिफायनरी प्रकल्पावरून बारसूमध्येही तणावाचं वातावरण आहे. सर्वेक्षण करण्यासाठी आलेले कर्मचारी आणि आंदोलक यांच्यामध्ये शुक्रवारी झटापट झाली, तसंच पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोपही केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र लाठीचार्जचा आरोप फेटाळून लावला आहे.'मी स्वत: उद्योगमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी बोललो आहे. दहा ते पंधरा मिनिटं नागरिक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. लाठीचार्ज झालेला नाही, ते भूमीपूत्र आहेत. काही लोक स्थानिक आहेत, काही बाहेरून आलेले आहेत. शेतकऱ्यांवर अन्याय करून जोर जबरदस्तीने काहीही होणार नाही,' असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form