विहिरीत पडून भूमापन कर्मचाऱ्याचा मृत्यू

 


दैनिक_लोकशाही_मतदार

कोल्हापूर - शेताची मोजणी करत असताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने भूमापन कार्यालयातील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना हातकणंगले तालुक्यातील रुई येथे सोमवारी सकाळी घडली आहे. दोन तासांच्या शोधमोहिमेनंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.राजेंद्र रामचंद्र कोळी (वय 45, रा. आष्टा, ता. वाळवा) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

रुई येथे गावालगतच असलेली शेतजमीन मोजण्यासाठी हातकणंगले येथील भूमापन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी आले होते. भूमापन करत पायवाटेने जात असताना राजेंद्र कोळी हे तोल जाऊन विहिरीमध्ये पडले. विहीर सुमारे 50 फूट खोल आहे व त्यामध्ये पाणीही आहे. काही नागरिकांनी विहिरीत उतरून कोळी यांना शोधण्याचा प्रयत्न केला; परंतु विहिरीमध्ये मोठय़ा प्रमाणात गाळ असल्यामुळे शोधकार्यात अडचण निर्माण येत होती. दरम्यान, या भागात शेतीपंपासाठी भारनियमन सुरू आहे. त्यामुळे संध्याकाळी वीजपुरवठा होणार असल्यामुळे विहिरीतील पाणी उपसा करण्यास अडचण निर्माण झाली होती. अखेर दोन तासांच्या शोधमोहिमेनंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान, भूमापन कार्यालयातील अधिकारी तसेच हातकणंगले पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form