अजित पवार भला माणूस



दैनिक_लोकशाही_मतदार

सातारा - अजित पवार भला माणूस आहे. त्यांचा कामाचा आवाका जबरदस्त असून कामाची पद्धत निश्चित चांगली आहे; पण त्यांची तिकडे गोची होत आहे. दरम्यान, लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याची स्पष्टोक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारपासून सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळगावी आले आहेत. यावेळी त्यांच्यासह कुटुंबीयांनी माध्यमांशी दिलखुलास चर्चा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधकांमधील अजितदादा पवार हा भला माणूस आहे. कामे कशी असावीत व ती कशी करून घ्यावीत, यात त्यांचा हातखंडा आहे. सर्वसामान्यांशी व लहानात लहान कार्यकर्त्यांशी त्यांची नाळ जुळलेली आहे. आमचे सहकारी मंत्री दीपक केसरकर विरोधकांचा समाचार घेत असताना मी मात्र माझ काम करतोय. विरोधकांना आरोप करू द्या. मी मात्र कामाने उत्तर देणार. 'बंड फसले असते तर' यासंबंधी त्यांनी केलेल्या वक्तव्यावर तेच सविस्तर उत्तर देतील. माझ्यामुळे एकाही आमदाराचे नुकसान होऊ नये, हीच माझी भूमिका होती.

जलयुक्त शिवार ही शेतकर्‍यांसाठी उपयुक्त योजना आहे. मागील मंत्रीमंडळाने ही योजना खूप चांगल्या पध्दतीने राबवली. त्याचा सर्वत्र फायदा झाला आहे. दुर्दैवाने ही योजना महाविकास आघाडीने बंद केली. आमचे सरकार आल्यानंतर मात्र आम्ही ती तातडीने सुरू केली. गावी आल्यानंतरही कामाचा झपाटा सुरुच आहे. कांदाटीखोर्‍यातला युवक बाहेर कामासाठी गेला नाही पाहिजे असा प्रामाणिक प्रयत्न आहे. इकडे पर्यटनाला मोठी संधी असल्याने त्यासाठी विविध प्रोजेक्ट राबवले जाणार आहे. तसेच कोयना धरणातील पाणी साठा अत्यल्प झाल्याने त्यामध्ये साठलेला गाळ दिसत आहे. हा गाळ काढला जाईल असेही मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मला शेतीची आवड आहे. शेतीवरून माझ्यावर टिका केली जात असते मी टिकेला उत्तर देत नाही. आज याठिकाणी केळाची, नारळाची झाडे लावत आहे. गावी आलो की प्रत्येक वेळी झाडे वाढवतो. यावेळी मिसेस मुख्यमंत्री यांनीही संवाद साधला. त्या म्हणाल्या, मलाही शेतीची आवड आहे. गेल्या वेळेस हजार किलो हळदीची झाडे लावली. इकडे यायला कायम आवडते, असेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form