दैनिक_लोकशाही_मतदार
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा रिमोट पंट्रोल पंतप्रधान मोदींच्या हातात असून, ही बीआरएस म्हणजे भाजपचीच बी टीम आहे व बीजेपी रिश्तेदार समिती हे त्यांचे खरे नाव असायला हवे, असा तिखट हल्ला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज येथील सभेत चंद्रशेखर यांच्यावर चढवला.भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राव आणि त्यांच्या पक्षाचे नेते भाजपच्या हुकमाचे ताबेदार झाले असल्याचा आरोप राहुल यांनी केला. याचसाठी जिथे बीआरएसचा सहभाग असेल अशा कुठल्याही आघाडीत काँग्रेस सहभागी होणार नाही, असे आपण सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना सांगितल्याचा दावाही त्यांनी केला.
खरे तर भाजपची ही रिश्तेदार समितीच असून केसीआरना ते राजे आणि तेलंगणा त्यांचे साम्राज्य असल्यासारखे वाटत आहे, असे ते म्हणाले. काँग्रेसने संसदेत नेहमीच भाजपला विरोध केला आहे आणि बीआरएस ही भाजपचीच बी टीम आहे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.काँग्रेसने अलीकडेच कर्नाटकातील भ्रष्ट आणि गरीबविरोधी सरकारच्या विरोधात निवडणूक लढवली होती. तेथील गोरगरीब, ओबीसी, अल्पसंख्याक आणि पीडितांच्या पाठबळावर आम्ही त्यांचा पराभव केला. यासारखेच काहीतरी तेलंगणातही घडून येणार आहे हे निश्चित. एका बाजूला राज्यातील धनदांडगे आणि दुसऱ्या बाजूला गोरगरीब, आदिवासी, अल्पसंख्याक, शेतकरी आणि छोटे व्यावसायिक, दुकानदार आमच्यासमवेत अशी ही लढाई असेल. आणि कर्नाटकमध्ये जे घडले तेच येथेही घडून येईल, असा आत्मविश्वास राहुल यांनी व्यक्त केला.
Tags
मुंबई