आता ॲपच्या माध्यमातून 'झेडपी'तील क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या कामावर राहणार वॉच

दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर- जिल्हा परिषदेच्या जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या गावभेट दौऱ्यासंदर्भात माहिती भरण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या संकल्पनेतून मोबाईल अॅप साकारण्यात आले आहे. गावभेट दौऱ्याचे जिओ टॅग फोटो व अहवाल संबंधित अधिकाऱ्यांना या अॅपवर भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. या अॅपचे कंट्रोल स्वतः जंगम यांच्याकडे असणार आहे.
विविध कामानिमित्त अधिकारी गावभेट दौऱ्यात जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, ग्रामपंचायत कार्यालय आदी ठिकाणच्या विकासकामांना भेट देतात. या गावभेटीचा डेटा कायम संरक्षित रहावा आणि या दौऱ्यात अधिकाऱ्यांना नेमके काय आढळले, याचा अहवाल मुख्यालयात तात्काळ उपलब्ध होवून त्यावर कार्यवाही करणे शक्य व्हावे, यासाठी या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या अॅपच्या वापरासंदर्भात अधिकारी आणि विभागप्रमुखांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. याबरोबरच या अॅपचा लॉगिन आयडी व पासवर्डही संबंधितांना देण्यात आला आहे.
प्रश्नांची तात्काळ सोडवणूक व्हावी हा उद्देश : सीईओ
गाव भेटीत अधिकाऱ्यांनी कोणकोणत्या बाबीची पाहणी केली. याबाबतचा अहवाल व जिओ टॅग फोटो तात्काळ गाव भेट दौरा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी फिरती अॅपवर डाऊनलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या अॅपमुळे कोणत्या अधिकाऱ्यांनी केंव्हा, कोणत्या वेळी गाव भेट दौरा केला. या पाहणीत त्यांना काय आढळले, याची माहिती मुख्यालयात एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. कामाची गती वाढवून कारभार पारदर्शक व्हावा, प्रश्नांची सोडवणुक तात्काळ व्हावी. हा यामागचा उद्देश असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form