दैनिक_लोकशाही_मतदार
करमाळा (प्रतिनिधी)- नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत सातत्याने बिघाड होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील अनेक भागांत अधूनमधून दोन ते चार दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी बाहेरून जार खरेदी करावी लागत आहे. तर वापरासाठी तब्बल ४०० रुपये टँकरला मोजावे लागत आहेत.नगरपालिकेकडून पाणीपट्टी तर पूर्ण वसुल केली जाते परंतु पाणी पुरवठा कायम सुरळीत का नाही असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. स्वखर्चाने पाणी खरेदी करावे लागत असल्याने जनतेत नाराजी आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाचे वातावरण असूनही पाणीटंचाई कायम आहे.दहिगाव पंपिंग स्टेशनवरील तांत्रिक बिघाड, खंडित वीजपुरवठा, पाइपलाईनमधील गळती, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, गढूळ पाणी आणि मौलाली माळ येथील जलशुद्धीकरण यंत्रणेची मर्यादा या सर्व कारणांमुळे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था कोलमडत आहे. व कमी दाबाने पाणी सोडले जात आहे यावर नगरपरिषदेने तातडीने ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
Tags
करमाळा