दिवेआगर येथील सुपारी संशोधन केंद्राची कामे लवकरात लवकर सुरू करा ; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश



दैनिक-लोकशाही-मतदार

 मुंबई -रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथील प्रस्तावित १४ कोटी रु.ची तरतुद असलेल्या सुपारी संशोधन केंद्राचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची कार्यवाही कृषी विभागाने करावी, असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे सुपारी संशोधन केंद्र सुरू करण्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या वर्षा लड्डा-उंटवाल, दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे, सहसंशोधक कल्पेश शिंदे, कृषी विभागाच्या उपसचिव प्रतिभा पाटील यासह इतर अधिकारी या उपस्थित होते.कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की,रायगड जिलह्यातील दिवेआगर (ता.श्रीवर्धन) येथे होणाऱ्या प्रस्तावित सुपारी संशोधन केंद्रामुळे स्थानिक शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाची सुपारीची रोपे मिळून या भागाला त्याचा चांगला फायदा होईल. या सुपारी संशोधन केंद्राच्या माध्यमातून सुपारीच्या बुटक्या तसेच दर्जेदार व अधिकचे उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित करणे, दिवेआगर व परिसरातील हवामानाचा विचार करून आंतरपिके घेण्याचे तंत्रज्ञान विकसित करणे, अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन, रोजगार निर्मिती, रोपवाटिका उभारणे, कलमे विकसित करणे, परिसरातील गावांचा ग्रामविकास आराखडा तयार करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येतील असे नियोजन करावे. सुपारी संशोधन केंद्रासाठी निधी मंजुर असून प्रस्तावित बांधकाम आणि इतर अनुषंगिक बाबीं पूर्ण होण्यासाठी दापोली कृषी विद्यापीठाने निविदा प्रक्रिया गतीने पूर्ण करून कामे सुरू करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form