सोलापूर (प्रतिनिधी)- निरोगी आयुष्य जगण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वैयक्तिक स्वच्छतेचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन हृदयरोग तज्ज्ञ डॉ. राहुल कारीमुंगी यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या महिला विकास कक्षाच्यावतीने आयोजित आहार, पोषण, स्वच्छता जनजागृती कार्यशाळेत ते बोलत होते.या कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. महानवर यांनी विद्यापीठामध्ये आरोग्य आणि स्वच्छतेविषयक उपक्रमांद्वारे विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे, असे सांगितले.यावेळी डॉ. राहुल कारीमुंगी यांनी स्वच्छतेचा शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम, वाढती जीवनशैलीजन्य आजारे, विशेषतः हृदयविकाराच्या वाढत्या घटनांमागील कारणे आणि त्यावरील उपाय यावर सखोल मार्गदर्शन केले. सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि मानसिक आरोग्याची निगा राखणे अत्यावश्यक आहे, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमात डॉ. कुसुम मोरे यांनीही मार्गदर्शन करत स्वच्छतेचे सामाजिक व आरोग्यदृष्ट्या महत्त्व विशद केले. कार्यक्रमात प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, महिला कक्षाच्या उपाध्यक्षा डॉ. ज्योती माशाळे, सचिव डॉ. अंजना लावंड, समन्वयक कांचन आघाव यांच्यासह देवकन्या पांढरे, सुवर्णा मुंडे, स्वाती तारापुरे, सुप्रिया अनभुले, अनिता भोसले यांची उपस्थिती लाभली. सूत्रसंचालन प्रा. श्रुती देवळे यांनी केले तर आभारप्रदर्शन राजश्री म्हेत्रे यांनी मानले.
