दैनिक_लोकशाही_मतदार
मुंबई - शिंदे-भाजप सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण होत नाही, तोच राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड करत युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.अजित पवार यांच्या सरकारमधील एन्ट्रीमुळे शिंदे गटात नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे लवकरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील, अशा उलट सूलटही चर्चा सुरू झाल्यात आहेत.दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री शिवसेनेचे आमदार तसेच खासदारांची वर्षा या शासकीय निवास्थानी बैठक घेतली. यावेळी शिंदेंनी आपल्या आमदारांसमोर एक मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्रीपदी मीच कायम राहणार असून २०२४ मध्ये ५० पेक्षा जास्त जागा आपल्याला लढवायच्या आहेत.
आपण ५० जागा जिंकून आणू त्यावर फोकस करा, असा कानमंत्र शिंदेंनी आमदारांना दिला. अजित पवार यांचा सरकारमधील प्रवेश म्हणजे केवळ राजकीय तडजोड आहे. ही तडजोड शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्या विरहीत आहे. त्यामुळे यापुढे घराणेशाहीच्या राजकारणाला आता स्थान मिळणार नाही.' असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना ठणकावून सांगितलं.माझ्या राजीनाम्याच्या बातम्या कोण पेरत आहेत हे देखील मला माहीत आहे. पण आपण या सगळ्याबाबत योग्य ती काळजी नक्कीच घेऊ. त्याचप्रमाणे संकटकाळात पाठिंबा देणाऱ्या सर्व ५० आमदारांना आपण निराश करणार नाही, असं आश्वासन देखील त्यांनी दिलं.
मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या सर्व आमदारांना त्यांच्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. तसेच, विकासकामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी पाच आमदारांची नियुक्ती करणार असल्याचे शिंदेंनी आमदारांना सांगितलं आहे.
