दैनिक_लोकशाही_मतदार
मुंबई - निर्भया फंडाचा निधी वाढवून देणे,रेल्वेमध्ये प्रवास करणा-या महिलांच्या सुरक्षितेकरिता मनुष्यबळ उपलब्ध करून देणे,रेल्वेमध्ये बेकायदेशीर प्रवास करणा-या प्रवाश्यांवर तत्काळ रेल्वे पोलीसांनी कारवाई करावी, रेल्वेमध्ये प्रवास करताना अपघात अथवा छेडछाडीची घटना घडल्यास पुनर्वसनासाठी तसेच वैद्यकीय मदत मिळावी यासाठी रेल्वेने योग्य ती कार्यवाही करावी.रेल्वेमध्ये प्रवास करणा-या महिलांच्या सुरक्षतेबाबत महाराष्ट्र पोलिस आणि रेल्वे पोलिस यांनी समन्वयांनी काम करण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांनी दिल्या.
विधानभवन येथे रेल्वमधील प्रवासी महिलांच्या सुरक्षितेबाबत आयोजित बैठकीत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. गो-हे बोलत होत्या.यावेळी गृह विभागाचे प्रधानसचिव अनुपकुमार सिंह,पोलीस महासंचालक (रेल्वे) डॉ.प्रज्ञा सरवदे,पोलीस आयुक्त(रेल्वे) रविंद्र शिसवे, मुंबई मध्य रेल्वेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी ऋुषी शुक्ला ,पोलीस उपायुक्त मध्य रेल्वे मनोज पाटील,पोलीस उपायुक्त पश्चीम रेल्वे संदीप भाजीभाकरे, यासह महिला दक्षता समितीच्या सदस्या रेणुका साळुंखे,अरुणा हळदणकर,लीला पाटोडे,आशा गायकवाड,प्रतिका वायंदडे यावेळी उपस्थित होत्या.
उपसभापती डॉ. गो-हे म्हणाल्या,अलीकडे रेल्वेमध्ये प्रवास करणा-या महिलांची छेडछाड करणे,गळयातील दागिने अथवा मौल्यवान वस्तू चोरण्याच्या घटना मोठया प्रमाणात घडत आहेत.कोणतीही महिला रात्री अथवा पहाटे रेल्वेमधून प्रवास करताना तिला अडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी महाराष्ट्र पोलिस आणि रेल्वे पोलिस यांनी समन्वयाने काम करावे. निर्भया फंडाचा निधी वाढवून देणे,रेल्वेमध्ये प्रवास करणा-या महिलांच्या सुरक्षितेकरिता मनुष्यबळ उपलब्ध करून देणे याबाबत गृह विभागाने तातडीने कार्यवाही करावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे देखील रेल्वेमधील प्रवासी महिलांच्या सुरक्षेकरिता लागाणा-या सुविधांबाबत मागणी करणार आहोत असेही उपसभापती डॉ.गो-हे म्हणाल्या
उपसभापती डॉ. गो-हे म्हणाल्या, महिला प्रवासी डब्यात सुरक्षिकरिता असलेला स्टाफ त्यांच्या नियोजित कामाच्या वेळी हजर आहेत का ? महिलांच्या तक्रारी येतात त्या टोल फ्री क्रमांकावर प्राप्त तक्रारींवर लगेच कार्यवाही करणे. महिलांच्या प्रत्येक डब्यात तसेच प्रत्येक प्लॅटफॉर्मवर सीसीटीव्ही बसविणे,रेल्वे डब्यामध्ये बेकायदेशीररित्या प्रवास करणा-या प्रवाश्यांवर कडक कारवाई करणे, महिलांच्या प्रवासी डब्यात टॉक बॅक सिस्टीम बसविणे यावर काम होणे गरजेचे आहे.महिला दक्षता समितीच्या सदस्यांची नावे व फोन नंबर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये दर्शनी भागात लावण्यात यावे.तसेच पोलीसांकडून महिलांबाबतीत होणारे गुन्हे लगेच दाखल करून घेवून त्यावरती कार्यवाही होणे गरजेचे आहे.यामध्ये ज्या महिलांना तत्काळ मदत मिळाली अशा काही जनजागृतीपर माहिती देखील देणारे अहवाल दर सहा महिन्यांनी संबधित पोलीस विभागाने मराठी,हिंदी व इंग्रजी भाषेतून प्रसिध्द करावेत. महिलांना तक्रार त्वरीत देता यावी यासाठी व्हॉटसग्रुप तयार करावेत.त्याचबरोबर रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या स्वच्छतागृहात सॅनिटरी नॅपकीन्स उपलब्ध करून देणे,माता व बालकांसाठी रेस्ट रुमची व्यवस्था करावी अशा सूचनाही उपसभापती डॉ.गो-हे यांनी केल्या.
गृह विभागाचे प्रधानसचिव अनुपकुमार सिंह,पोलीस महासंचालक (रेल्वे) डॉ.प्रज्ञा सरवदे,पोलीस आयुक्त (रेल्वे) रविंद्र शिसवे य मुंबई मध्य रेल्वेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी ऋुषी शुक्ला यांनी रेल्वमधील प्रवासी महिलांच्या सुरक्षितेबाबत यावेळी माहिती दिली.
