मोठी बातमी | सोलापुरातील भाजपचे मा. सभागृहनेता सुरेश पाटील यांचा भाजपाला राम राम

 


दैनिक_लोकशाही_मतदार -

"पत्र जशास तसे"

   सोलापूर - सोलापूर भारतीय जनता पक्षाचे अध्वर्यू माजी खासदार स्व. लिंगराजजी वल्याळ यांच्या धडाकेबाज कामाने प्रेरित होवून १९८५ साली मी भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व स्विकारले आणि वल्याळ साहेबांच्या आदेशाने पक्षाचा एक सामान्य प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पोलींग एजंट म्हणून जबाबदारी पार पाडली, मला अजूनही आठवतात ते दिवस जेंव्हा आमच्या भागात भाजपाचा झेंडा धरायला पण कार्यकर्ते मिळत नव्हते एवढी प्रचंड ताकद आणि दहशत त्यावेळी काँग्रेस पक्षाची होती, अशा प्रतिकुल परिस्थितीत स्व. वल्याळ साहेबांच्या नेतृत्वाखाली कोणत्याही दबाव, दडपणाला न जुमानता पक्षाचे काम उभे केले, १९९२ च्या महापालीका निवडणूकीत स्व. शकुंतला मुजगोंड यांना निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर देवून मला निवडणूक प्रमुख करण्यात आले आणि मी ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडीत आमच्या भवानीपेठ घोंगडेवस्ती परिसरात भाजपाचा पहिला नगरसेवक निवडून दिला, या कामाची पावती म्हणून मला पक्षाने शहर उत्तर युवामोर्चा मंडल अध्यक्षाची जबाबदारी दिली ही जबाबदारीपार पाडत असताना शेकडो युवकांना पक्षाच्या प्रवाहात आणून पक्षसंघटन मजबूत केले म्हणून १९९७ सालच्या पालिका निवडणूकीत मला उमेदवारी मिळाली आणि सोलापूर शहरात सर्वाधिक विक्रमी मतानी विजयी झालो तेंव्हापासून ते आजपर्यंत सलग पंचवीस वर्षे अनेक दिग्गजांच्या विरोधात विक्रमी मताधिक्याने विजय मिळवितच आलो आहे, माझ्या प्रामाणीक कामाचे फळ म्हणून मला पक्षाने स्थायी समिती अध्यक्ष, विरोधीपक्ष नेता, सभागृहनेता, सलग पाच वर्षे स्थायी समिती सदस्यत्व, जिल्हा नियोजन समिती सदस्य, अशा विविध जबाबदाऱ्या दिल्या होत्या त्या मी प्रभावीपणाने पूर्ण केलो आहे, पक्षानी दिलेल्या संधीबद्दल मी पक्षाचे मनःपूर्वक आभार मानतो. महोदय माझ्या यशाचा चढता आलेख बघता आणि सभागृहनेता आपल्या दारी या अभिनव उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद पाहून कांही मंडळींना माझा द्वेष वाटू लागला आणि इथुनच माझ्या खच्चिकरणाला षडयंत्राने सुरवात झाली, मी भविष्यात आमदार पदाचा दावेदार होवू शकतो म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधीनीं माझ्यावर थेलीअम नावाच्या विषाचा प्रयोग केला आणि मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला, दैवीकृपेने आणि जनेतेच्या सेवेचा मिळालेल्या आशीर्वादाने मी प्रदीर्घ संघर्ष करून आजारातून बाहेर पडलो, मी आता पूर्णतः बरा होवून पुन्हा राजकारणात सक्रिय होताना पाहून त्याच लोकप्रतिधीनी माझ्या प्रभागातील विरोधकांना ताकद देणे, माझ्या प्रभागात मला डावलून कार्यक्रम घेणे, माझ्या प्रभागासाठी निधी मंजूर न करणे, यासह व्यक्तिगत पातळीवर जाऊन मला त्रास होईल असे कृती वारंवार करीत आले आहेत, या विषयीचे वस्तुस्थिती विभागीय संघटनमंत्री मकरंद देशपांडे, रवि अनासपूरे, यांच्यापासून प्रदेश पातळीच्या अनेक नेत्यांच्या नजरेस आणली परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी विरोधात कारवाई तर दूर साधी चौकशीपण झाली नाही याची मला खंत वाटते. महोदय, स्व. अटलजी, प्रमोदजी, गोपीनाथजी,स्व. लिंगराज वल्याळ यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या कार्यकर्त्याला सध्या पक्षामध्ये जे चालू आहे ते अजिबातच न आवडणारे आहे, एकीकडे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना एकमेव यशस्वी पंतप्रधान आणि विश्वगुरु म्हणायचे आणि दुसरीकडे ज्यांच्या विरोधात आम्ही आयुष्यभर संघर्ष केला, ज्यांच्या पक्षावर दस्तुरखुद्द पंतप्रधानांनी ७० हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता अशा भ्रष्ट आणि घोटाळेबाज लोकांबरोबर सत्ता स्थापन करायचं हे कुठले नितीतत्व कळेनासे झाले आहे. भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेवून जर मोदीजींना प्रधानमंत्री करायचे असेल तर आता नेतेमंडळीनी संघ, स्व. शामाप्रसादजी, दीनदयालजी, अटलजी यांचा वारसा सांगणे बंदच करावं असे माझ्यासारख्या लाखो प्रामाणीक कार्यकर्त्यानां वाटत आहे, ज्यांनी परिश्रम करून १०५ आमदार आणले त्या आदरणीय देवेंद्रजीनां उपमुख्यमंत्री आणि स्वार्थासाठी आलेल्यानां मुख्यमंत्रीपद पद हा कुठला न्याय ? आता तर अजित पवार मी मुख्यमंत्री होणार असे कालच्या मेळाव्यात जाहीर केले, म्हणजे त्यांना कुणी शब्द दिला ? ७० जागा लढवून मी मुख्यमंत्री होणार अस अजब गणित दादा कस मांडू शकतात? अशा संधीसाधू, स्वार्थी, भ्रष्ट लोकांना पक्षात आणि संघटनेत मिळणारे मानाचे पान आणि ज्यांनी पक्ष वाढवला, रुजवला, त्याग केला आयुष्याची उमेदीची वर्षे खर्ची घातली त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा जो प्रयत्न होतोय तो माझ्या सारख्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांला सहन न होणारा असल्याने मी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक आणि क्रियाशिल सदस्यत्वाचा राजिनामा देत आहे, कृपया तो स्विकारावा ही विनंती, आपला स्वाभिमानी सहकारी, सुरेश सदाशिव पाटील, माजी सभागृहनेता सोमनपा.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form