दैनिक_लोकशाही_मतदार
मुंबई - औरंगजेबच्या मुद्द्यावरून आज विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. औरंगजेबाचा स्टेट्स ठेवला म्हणून काही तरुणांवर कारवाई होते. मग औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्यावर कारवाई का होत नाही?असा सवाल समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यांच्या या प्रश्नाला गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अबू आझमी यांच्या आरोपांचं खंडन केलं आहे. जेव्हा बाळासाहेब आंबेडकर हे कबरीवर गेले होते. त्यावेळी त्यांना देखील मी आवाहन केलं होतं. कारण ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. त्या काळात बाबासाहेब आंबेडकरांना हैदराबादच्या निजामाने आमीश दाखवली होती. परंतु या देशाच्या भूमीवरचा धम्म आहे, तोच मी स्वीकारणार, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. तुम्ही कबरीवर जाऊन औरंगजेबाचं महिमामंडन करू नका, असं मी प्रकाश आंबेडकरांना सांगितलं. औरंगजेब शासक होता. त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर मजार तिथे आहे. ती संरक्षित आहे. आपण लोकशाहीत आहोत. इतर देशातील व्यक्तीचं निधन झालं तरी त्याचं या देशात दफन केलं जातं. दोन धर्मात तेढ निर्माण करणं हा गुन्हा आहे. औरंगजेबाच्याकबरीवर जाणं गुन्हा नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ज्यावेळी अशा प्रकारचं स्टेट्स ठेवून हाच तुमचा बाप आहे, हाच सगळा हे आहे, असं लिहिलं जातं त्यावेळी हा गुन्हा आहे. मला अबू आझमींना देखील सांगायचं आहे की, लोकशाहीत आपण निवडून येतो. प्रत्येकाला आपला मतदारसंघ यचा आहे. पण हे पाहत असताना काही गोष्टी राष्ट्रहिताच्या असतात. त्यावेळी आपण तडजोड करू नये. देशाचा इतिहास पाहिला तर अनेक मुस्लिम नेत्यांनी या देशासाठी बलिदान केलं. त्यांनी हा विचार केला नाही. कोण कोणत्या जातीचा आहे हे पाहिलं नाही. त्यांनी देश पहिला असं म्हटलं. मतांच्या राजकारणाकरीता किंवा लांगूलचालनासाठी काहीही करू नका, असं आवाहन करतानाच जाती आणि धर्माच्या आधारावर कुणालाही दुय्यम वागणूक दिली जाणार नाही. परंतु कुणीही हे जाणूनबुजून करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

