झेडपी समाजकल्याणचा पदभार स्मिता पाटील यांच्याकडे

दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर-जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचा अतिरिक्त पदभार प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. पाटील यांनी बुधवारी हा पदभार स्वीकारला असून समाज कल्याण विभागाची तातडीची बैठक घेऊन कामकाजाची माहिती घेतली.
जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांच्यावर लातूर व सोलापूर येथील कामकाजाचा ठपका ठेवून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे रिक्त झालेल्या पदावर महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी प्रसाद मिरकले यांच्याकडे ही अतिरिक्त जबाबदारी सोपवण्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी निर्णय घेतला होता. त्यामुळे मिरकले यांच्याकडे ही जबाबदारी आली होती. समाजकल्याण विभागात कामकाजात अनियमित्ता असल्यामुळे मोठ्या अडचणी येत होत्या. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी काही दिवसांपूर्वी समाजकल्याण विभागाला अचानक भेट देऊन झाडाझडती घेतली होती. तरीही कर्मचाऱ्यांच्या कामकाजात बदल न दिसल्यामुळे कामांमध्ये गतिमानता दिसून येत नव्हती. अशात मिरकले यांनी हा अतिरिक्त पदभार नको असल्याचे कळविले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी समाजकल्याणचा पदभार प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला.
पाटील यांनी समाजकल्याण विभागाची बुधवारी बैठक घेतली व संबंधित कर्मचाऱ्यांना कामकाजासंबंधी सूचना केल्या. समाजकल्याण विभागाचा यापूर्वी पदभार प्रशासन विभागाकडे गेला होता. तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, चंचल पाटील यांनी या विभागाचे कामकाज सांभाळले होते. तिसऱ्यांदा असा पदभार द्यावा लागला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form