दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी) - सोने-चांदीच्या दुकानांत कामगारांना बोलण्यात व्यस्त ठेवून दागिने चोरीचा गुन्हा दाखल असलेल्या महिलेस पोलिस आयुक्तालयाकडून दोन वर्षांसाठी सोलापूरसह धाराशिव जिल्ह्यातून तडीपारीचा आदेश मंगळवारी बजावण्यात आला. संगीता शेखर जाधव (वय ४५, रा. धोंडीबा वस्ती, रामवाडी) असे या महिलेचे नाव आहे.संगीता जाधव या महिलेविरुद्ध २०२३ व २०२४ मध्ये बुरखा घालून सोने-चांदी विक्रीच्या दुकानात जाऊन त्या ठिकाणी दुकानातील कामगारांना बोलण्यामध्ये व्यस्त ठेवून त्यांची नजर चुकवून सोने-चांदीच्या दागिन्यांची चोरी करणे, चोरी करताना त्यांना कोणीपकडल्यास त्यांच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार देणे, सोबत आणलेल्या पुरुषांकडून प्रसंगी मारहाण करण्यास लावणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तिच्याविरुद्ध जेल रोड पोलिस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये 'तडीपार'चा प्रस्ताव पोलिस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांना सादर केला होता.
या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलिस उपायुक्त कबाडे यांनी कारवाई करून संगीता जाधव हीस सोलापूर व धाराशीव जिल्हा येथून दोन वर्षांकरिता तडीपार केले आहे. या महिलेस तडीपार केल्यानंतर ठाणे येथे सोडण्यात आले.
