मंगळवारी होम प्रदीपन सोहळा : बुधवारी रंगणार शोभेचे दारूकाम
दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी) -ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील पहिला विधी उद्या (शुक्रवारी) सकाळी शेटे वाड्यात योगदंड पूजनाने होणार असून, रविवारी मानाच्या सातही नंदीध्वज मिरवणुकीने पंचक्रोशीतील ६८ लिंगांना तैलाभिषेक होणार आहे. सोमवार, दि.१३ जानेवारी रोजी मंदिर परिसरातील सम्मती कट्टयावर मुख्य सोहळा अर्थात अक्षता सोहळा रंगणार असल्याचे यात्रेतील प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
मंगळवारी होम मैदानावर होम प्रदीपन सोहळा, तर बुधवारी सायंकाळी शोभेचे दारूकाम आणि रात्री डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहासमोर भाकणूक होणार आहे तैलाभिषेक, अक्षता, होम प्रदीपन अन् शोभेच्या दारूकामावेळी मानाच्या सातही नंदीध्वज मिरवणुकीने हिरेहब्बू वाड्यापासून मार्गस्थ होणार असून, पारंपरिक मार्गावरून ही मिरवणूक निघणार आहे. तैलाभिषेक अन् अक्षता सोहळ्याच्या दिवशी नंदीध्वज मिरवणुकीने ६८ लिंगांना प्रदक्षिणा घालण्यात येणार आहे.
असा राहणार धार्मिक विधी
■ १० जानेवारी शेटे वाड्यात सकाळी योगदंड पूजा
■ ११ जानेवारी हिरेहब्बू वाड्यात साज चढवण्याचा कार्यक्रम
■ १२ जानेवारी ६८ लिंगांना तैलाभिषेक
■ १३ जानेवारी सम्मती कट्ट्यावर अक्षता सोहळा
■ १४ जानेवारी सकाळी ९ वाजता योगदंड, नंदीध्वजांना गंगास्नान, सायंकाळी ५ वाजता मानाच्या पहिल्या नंदीध्वजास नागफणा बांधण्याचा कार्यक्रम, रात्री ८ वाजता होम प्रदीपन सोहळा, रात्री ११ वाजता भाकणूक.
■ १५ जानेवारी शोभेचे दारूकाम १६ जानेवारी कप्पडकळी
१६ जानेवारीला कप्पडकळीने यात्रेची सांगता
१६ जानेवारी रोजी मानकरी देशमुख यांच्या वाड्यात कप्पडकळीने यात्रेची सांगता होणार आहे. योगदंडाच्या पूजनानंतर हिरेहब्बू मंडळींची पाद्यपूजा होते आणि त्यानंतर हिरेहब्बू मंडळी आपल्या अंगावरील भगवी वस्त्रे उतरवतात. त्याच दिवशी रात्री मानाचे पाचही नंदीध्वजांसह नंदीध्वजधारक, मानकरी आणि भक्तगण श्री मल्लिकार्जुन मंदिरात पाच प्रदक्षिणा घालून यात्रेचा शेवट गोड करणार असल्याचे हिरेहब्बू यांनी सांगितले.
यंदाही सोमनाथ मेंगाणे यांना मान
होम प्रदीपन सोहळ्याच्या दिवशी जुन्या फौजदार चावडीजवळ पहिल्या नंदीध्वजास नागफणा बांधला जातो. तेथून तो नंदीध्वज पेलत होम मैदानावर आणण्याचा मान यंदाही मानकरी सोमनाथ मेंगाणे यांना मिळाला आहे. आपल्या हातून यंदाही ही सेवा घडत आहे. यामागे सिद्धरामाचीच कृपा असल्याचे त्यांनी सांगितले.
