दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- शहरात नव्याने थाटलेल्या ज्वेलर्स दुकानात कर्मचाऱ्यानेच पावणेसात लाखांचे सोने चांदीचे दागिने लंपास केले. सदर बझार पोलिसांत कर्मचाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३०६ प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.
ही घटना जुना एम्प्लॉयमेंट चौक ते डफरीन चौकदरम्यान पटवर्धन चौकातील पु. ना. गाडगीळ ज्वेलर्समध्ये २३ जानेवारी रोजी घडली आहे. राजकुमार बिराजदार (रा. सोलापूर) असे गुन्हा नोंद झालेल्या आरोपीचे नाव आहे. बिराजदार हा पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स येथे सुपरवायझर म्हणून कामास होता. २३ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास बिराजदार ज्वेलर्समधून बाहेर पडला. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले की ७१.५ ग्रॅम वजनाची सोन्याची वेडणी आणि एक किलो चांदीचा बार चोरीला गेला.
बिराजदार याने सोने व चांदी चोरून कंपनीची फसवणूक केली, अशी फिर्याद मुख्य व्यवस्थापक राहुल बाकळे (वय ३३, रा. भवानी पेठ) यांनी दिली. दोन आठवड्यांपूर्वी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या हस्ते या नवीन दालनाचे उद्घाटन झाले होते.
सोन्याची ७ तोळ्याची वेडणी, १ किलो चांदीचा बार लंपास
पाच लाख ९२ हजार रुपये किमतीची ७१.५ ग्रॅम वजनाची सोन्याची वेडणी आणि ९५ हजार रुपये किमतीचा एक किलो चांदीचा बार चोरीला गेला.
Tags
सोलापूर