दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)-जगभरात पोलिओ निर्मूलनासाठी झगडणाऱ्या संस्थांमध्ये रोटरी इंटरनॅशनलचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आणि ऐतिहासिक आहे. १९८५ साली रोटरीने “पोलिओ प्लस” या मोहिमेची सुरुवात करून जागतिक आरोग्य संघटना (WHO), यूनीसेफ आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन यांच्यासोबत भागीदारीतून ही लढाई सुरू केली. त्यातून आज जगातील ९९.९% पोलिओच्या केसेस संपुष्टात आल्या आहेत.भारताने २०१४ साली “पोलिओमुक्त” देश म्हणून युनोच्या मान्यतेसह इतिहास घडवला, आणि त्यामध्ये रोटरी क्लब्सनी घरोघरी जाऊन लसीकरण जनजागृतीपासून ते पोलिओ ड्रॉप्स देण्यापर्यंत अमूल्य कार्य केले.
रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३२, ज्यामध्ये संपूर्ण मराठवाडा तसेच सोलापूर, सातारा व अहिल्यानगर जिल्ह्यातील ९७ क्लब्स कार्यरत आहेत, यांनीही पोलिओ निर्मूलन मोहिमेत उल्लेखनीय योगदान दिले आहे. दरवर्षी राष्ट्रीय लसीकरण दिवस (NID) निमित्ताने क्लब सदस्य स्वयंसेवक म्हणून लसीकरण केंद्रांवर काम करतात. यासोबतच रोटरी क्लब्सकडून शाळा, गावांमध्ये जनजागृती मोहीमा राबवून पालकांमध्ये जागरूकता वाढवण्याचे कार्य केले जाते.रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ क्लब्सनी गेल्या काळात हजारो मुलांना पोलिओ ड्रॉप्स देण्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. यावर्षी डिस्ट्रिक्ट ३१३२ अंतर्गत विविध क्लब्सनी रस्त्यावर जनजागृती रॅली, पोस्टर प्रदर्शन, तसेच सोशल मीडियावर पोलिओ जनजागृती मोहिमा देखील राबवल्या.डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ सुरेश साबू यांच्या नेतृत्वाखाली आणि डिस्ट्रिक्ट पब्लिक इमेज संचालक रो रविंद्र बनकर व संपूर्ण टीमच्या सक्रिय सहभागातून पोलिओ निर्मूलनाबाबत रोटरीचे योगदान अधिक व्यापक पातळीवर पोहोचवण्याचे कार्य सुरू आहे अशी माहिती क्लब अध्यक्ष रोजानवी माखीजा यांनी दिली.आजही अफगाणिस्तान व पाकिस्तानमध्ये पोलिओचे थोडेसे अस्तित्व आहे, पण रोटरीच्या “पोलिओ प्लस” मोहिमेच्या माध्यमातून ती ठिकाणीदेखील ही लस पोहचवण्याचे कार्य चालू आहे.रोटरीचा हा सामाजिक बदल घडवणारा इतिहास भावी पिढीला आरोग्यदायी जीवनाचा वारसा देणारा आहे.
