महसूल सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ ; जिल्ह्यात 7 ऑगस्टपर्यंत विविध जनहित कार्यक्रमांचे आयोजन

 



दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर (प्रतिनिधी)- महसूल विभागाच्या विविध सेवा व योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून त्यांचा लाभ नागरिकांना मिळावा, यासाठी 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

तरी महसूल विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी शासनाच्या योजना सर्वसामान्य पर्यंत पोहोचतील यासाठी अत्यंत काटेकोरपणे नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी असे आव्हान प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले.

    जिल्हा प्रशासनाच्या वतीने 'महसूल सप्ताह 2025' चा भव्य शुभारंभ आज श्री शिवछत्रपती रंगभवन येथे झाला. प्रभारी जिल्हाधिकारी  कुलदीप जंगम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास पोलीस आयुक्त श्री एम. राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हाधिकारी निवडणूक गणेश निराळे, उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे, उपविभागीय प्रांताधिकारी सचिन इथापे, प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे, अकलूज प्रांताधिकारी विजया पांगारकर, कुर्डुवाडी प्रांताधिकारी जयश्री आवाड, तहसीलदार निलेश पाटील, संजय भोसले, मदन जाधव, श्रीकांत पाटील, शिल्पा पाटील, शिल्पा ओसवाल यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     जनजागृती आणि विश्वासवृद्धीसाठी विशेष मोहिम

प्रभारी जिल्हाधिकारी जंगम यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले की, “महसूल विभागाच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, शासनाच्या कामकाजाबाबत विश्वास वाढवणे आणि योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा महसूल सप्ताह साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.”

महसूल कर्मचाऱ्यांचा गौरव - महसूल दिनानिमित्त 2024-25 मध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 56 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याशिवाय कार्यरत कर्मचाऱ्यांच्या 10वी व 12वीच्या गुणवंत पाल्यांचा देखील गौरव करण्यात आला.जंगम यांनी महसूल कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.पोलीस आयुक्तांचे विशेष मनोगत- पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी महसूल कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की, “शासनाचे कोणतेही महत्त्वाचे काम असो, त्याची जबाबदारी सर्वप्रथम महसूल विभागावरच असते. त्यांच्या कार्यक्षमतेमुळेच प्रशासन सुरळीत चालते.”

सप्ताहभर उपक्रमांची मालिका- महसूल सप्ताहात जिल्ह्यात विविध जनजागृती मोहिमा, योजनांचे लाभ वितरण, माहिती सत्रे, कार्यशाळा आणि नागरिक संवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. महसूल विभागाच्या कार्यपद्धतीबाबत पारदर्शकता आणि जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपजिल्हाधिकारी गणेश निराळे यांनी प्रस्तावना सादर केली, तर अमित माळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form