सोलापूर (प्रतिनिधी)- दिवाळी निमित्ताने बाहेरगावी व बाजारात खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घ्यावी, असे आवाहन वळसंग पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राहुल डोंगरे यांनी केले आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिक आपल्या गावी जात असतात. याच काळात चोऱ्या आणि घरफोडीच्या घटना घडत असतात. बाहेरगावी जाताना घरमालक तसेच व्यापारी आणि दुकानदारांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम मौल्यवान वस्तू घरात न ठेवता बँक, लॉकर किंवा आपल्या सोयीनुसार सुरक्षित ठिकाणी ठेवावे. तसेच आपली दुचाकी, चार चाकी वाहनेसुद्धा सुरक्षित लॉक करून ठेवावे. परिसरात कार्यरत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे ते व्यवस्थित सुरू असल्याची तपासणी व खात्री करून घ्यावी. वॉचमन असलेल्या ठिकाणी नवीन व्यक्ती आढळल्यास त्याची पूर्ण खात्री करून घेण्याचे तसेच वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटील यांनीसुद्धा काळजी घेण्याचे आवाहन डोंगरे यांनी केले आहे.
