शालार्थ आयडीचा वेतन चालू करण्यासाठी एक लाखाची लाच घेताना उपनिरीक्षक लाचलुचपत च्या जाळ्यात


पुणे- थोडक्यात माहिती यातील तक्रारदार यांची पत्नी सोलापूर जिल्ह्यात एका माध्यमिक शाळेत सहशिक्षिका म्हणून नोकरीस आहेत त्यांना शालार्थ आयडी' नसल्याने त्या 2016 पासून विना वेतन काम करत आहेत. त्यांचा शालार्थ आयडी मंजूर झाल्यानंतर त्यांना वेतन चालू होणार होते. सदरचा शालार्थ आयडी मंजूर करण्यासाठी यातील तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीचा शालार्थ आयडी चा प्रस्ताव दि.16/6/2025 रोजी त्यांचे विभागाचे शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे, येथे दाखल केला होता. सदरचा प्रस्ताव 'ई- ऑफिस' मार्फत विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे, यांना सादर करण्यासाठी व तो प्रस्ताव मंजूर करून देण्यासाठी विभागीय शिक्षण उप संचालक यांच्या कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेले आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे 1 लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली असल्याबाबतची तक्रार तक्रारदार यांनी दि. 17/11/2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे तक्रार दिली होती.
सदर तक्रारदार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने 17/11/2025 व 21/11/2025 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली होती. दि.21/11/2015 रोजीच्या विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे, यांच्या कार्यालयात झालेल्या पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेवक रावसाहेब मिरगणे, शिक्षण उपनिरीक्षक, यांनी तक्रारदाराच्या पत्नीची 'शालार्थ आयडी' मंजूर करून देण्यासाठी 1 लाख रुपयाच्या लाचेची मागणी करून ती लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर आरोपी शिक्षण उप निरीक्षक लोकसेवक रावसाहेब मिरगणे यांनी आज रोजी 25/11/2025 रोजी 18.21 वा. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये स्वतःच्या केबिनमध्ये तक्रारदाराकडून 1 लाख रुपयाची लाच पंचासमक्ष स्वीकारली असता रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
वरील आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाणे, पुणे शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form