बालविवाह प्रतिबंधासाठी महात्मा फुले समाज सेवा मंडळाचा पाठपुरावा; १० प्रकरणांत कारवाई, जनजागृतीवर भर

 

अल्पवयीन मातांची यादी समोर आल्याने प्रशासन हलले; लोककलेतून समाजप्रबोधनाची मोहीम


सोलापूर (प्रतिनिधी)-बालविवाह निर्मूलनासाठी कार्यरत असलेल्या महात्मा फुले समाज सेवा मंडळ, करमाळा या संस्थेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला प्रशासकीय स्तरावर यश मिळत असून, आतापर्यंत १० प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे बालविवाह आणि अल्पवयीन मातांच्या सुरक्षिततेचा गंभीर मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.संस्थेने ‘महाराष्ट्र विवाह मंडळांचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम, १९९८’ अंतर्गत महानगरपालिकेकडे विवाह नोंदींची माहिती मागवली होती. मात्र, प्रशासकीय पातळीवरील तांत्रिक त्रुटीमुळे वैद्यकीय विभागाकडून ‘अल्पवयीन माता’ यांची यादी संस्थेकडे प्राप्त झाली. या चुकीमुळे एक गंभीर वास्तव उघड झाले.ही माहिती मिळताच संस्थेने ३१ मार्च रोजी ई-मेलद्वारे प्रशासनाला कळवले, परंतु सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यानंतर ७ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष अर्ज सादर करण्यात आला. या पाठपुराव्यानंतर प्रशासन सक्रिय झाले आणि महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोग तसेच जिल्हास्तरीय विशेष चौकशी समितीमार्फत संबंधित विभागांकडून माहिती मागवण्यात आली.दरम्यान, पोलिस आयुक्त (शहर) यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १० प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. POCSO कायद्यातील कलम १९ आणि २१ नुसार अशा प्रकारची माहिती संबंधित यंत्रणेला देणे बंधनकारक असून, संस्थेने गोपनीयतेचे सर्व नियम पाळत माहिती सुपूर्द केली आहे.केवळ कायदेशीर कारवाई पुरेशी नसून समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे संस्थेचे मत आहे. यासाठी संस्था आता व्यापक जनजागृती मोहीम राबविणार आहे. वाघ्या-मुरळी, भारुड आणि पथनाट्य यांसारख्या लोककलेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात बालविवाहाचे दुष्परिणाम प्रभावी पणे मांडले जाणार असल्याचे संस्थेच्या रजनीगंधा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.संस्थेच्या मते, परंपरांच्या नावाखाली होणाऱ्या बालविवाहांना आळा घालण्यासाठी सांस्कृतिक प्रबोधन अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे लोककला हे प्रभावी साधन ठरू शकते.

निष्कर्ष:- वैद्यकीय विभागाच्या तांत्रिक चुकीतून समोर आलेल्या या प्रकरणाने बालविवाहाचा गंभीर प्रश्न अधोरेखित केला आहे. पुढील काळात केवळ चौकशीपुरते मर्यादित न राहता वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि व्यापक समाजप्रबोधनावर भर देण्याचा संस्थेचा निर्धार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post