सोलापूर (प्रतिनिधी)- गहाळ व चोरीस गेलेल्या मोबाईल हॅन्डसेटचा शोध घेण्यासाठी केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाने सुरू केलेल्या CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलचा प्रभावी वापर करत सोलापूर शहर पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. CEIR पोर्टल तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत पोलिसांनी विविध कंपन्यांचे तब्बल १८४ मोबाईल हॅन्डसेट हस्तगत केले असून, त्यांची एकूण किंमत सुमारे ३० लाख ६९ हजार ४८३ रुपये आहे. सोलापूर शहरातून विविध कारणांनी गहाळ झालेले तसेच चोरीस गेलेले मोबाईल हॅन्डसेट शोधण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने विशेष तपास मोहीम राबविण्यात आली. CEIR पोर्टलवर उपलब्ध माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून संबंधित मोबाईल हॅन्डसेटचा ठावठिकाणा निश्चित करण्यात आला. त्यानंतर तपास पथके परजिल्ह्यांसह परराज्यांत पाठवून प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली. तपास पथकातील पोलिस अंमलदारांनी तांत्रिक कौशल्याचा प्रभावी वापर करत विविध ठिकाणांहून गहाळ झालेले मोबाईल हस्तगत केले. या कारवाईमुळे नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान टळले असून, गहाळ मोबाईल परत मिळण्याच्या आशेला मोठा आधार मिळाला आहे.ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त प्रितम यावलकर, पोलीस उपआयुक्त अश्विनी पाटील तसेच सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.या मोहिमेत पोहेकॉ. महंमद रफिक इनामदार, पोहेकॉ. संतोष पापडे, पोहेकॉ. एकनाथ उबाळे, पोहेकॉ. खाजाप्पा आरेवनवरु, पोहेकॉ. लक्ष्मीकांत फुटाणे, पोहेकॉ. बाबू मंगरुळे, पोहेकॉ. विठ्ठल पैकेकरी, पोहेकॉ. बाबर, पोना. अयाज बागलकोटे, पो.कॉ. अर्जुन गायकवाड, पो.कॉ. पंकज घाडगे, पो.कॉ. विनायक जाधव, पो.कॉ. शैलेश स्वामी, पो.कॉ. समाधान मारकड, पो.कॉ. संतोष वायदंडे, पो.कॉ. बाबुराव क्षिरसागर, पो.कॉ. महेंद्र फुलारी आणि पो.कॉ. सैफअली मुजावर यांनी सहभाग घेतला.
तांत्रिक तपासाला यश - CEIR पोर्टलच्या माध्यमातून मोबाईलची माहिती शोधून त्यावर तांत्रिक विश्लेषण करत प्रत्यक्ष ठिकाणी तपासाची सांगड घालण्यात आली. त्यामुळे सोलापूर शहरातून गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले. १८४ मोबाईल हॅन्डसेटची तब्बल ३०,६९,४८३ रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आल्याने सोलापूर पोलिसांच्या तांत्रिक तपास क्षमतेचे हे आणखी एक ठळक उदाहरण ठरले आहे.
