देवस्थान इनाम जमिनींच्या प्रश्नासाठी राज्यव्यापी लढा; नियमांमध्ये एकसूत्रता आणण्याची मागणी

सोलापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील देवस्थान इनाम जमिनींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासनाने सर्वंकष धोरण आखावे, तसेच देवस्थान इनाम जमिनींसंदर्भातील नियमांमध्ये एकसूत्रता आणून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी देवस्थान इनाम जमीन कृती समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आली आहे.
समितीने सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून देवस्थान इनाम जमीनधारकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधले आहे. राज्यातील देवस्थान इनाम जमिनींसाठी एकसमान कायदे व नियमावली असावी, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अनेक वर्षांपासून देवस्थान इनाम जमिनीच्या प्रश्नावर जमीनधारकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी जमिनींच्या नोंदी, वर्ग बदल, हस्तांतरण तसेच वारस नोंदींसंदर्भात वेगवेगळ्या पद्धतीने कार्यवाही होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
देवस्थान इनाम जमिनींचे वर्ग २ व वर्ग ३ मधून वर्ग १ मध्ये रूपांतर करून सर्वसामान्य शेतकऱ्यांप्रमाणे जमीनधारकांना अधिकार व सुविधा मिळाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा विचार करून शासनाने यासंदर्भात स्पष्ट व एकसमान धोरण जाहीर करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
काही ठिकाणी महसूल कर्मचाऱ्यांकडून अथवा अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या कथित मनमानी कारभारावर नियंत्रण ठेवून देवस्थान इनाम जमीनधारकांना न्याय मिळवून द्यावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अल्पसंख्याक देवस्थान इनामधारकांना त्यांच्या धार्मिक परंपरा व पूजा-अर्चेसाठी जमिनींच्या व्यवहारात येणाऱ्या अडचणी दूर करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या मागणीला अखिल गुरव समाज संघटना, सोलापूर जिल्हा तसेच संघटनेचे विविध पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. यामध्ये रघुनाथ गुरव, किशोर काका पाटील, शकुंतला नडगिरे, आदिनाथ पुजारी, गणेश गुरव, मोहन आप्पा क्षिरसागर, दिलीप गुरव, दत्तात्रय गुरव, आबासाहेब अविनाश कामतकर, मनोज गोविंद पुजारी, सागर काळे, सागर गुरव (अंधळगाव), विनायक गुरव, महेश गुरव, सुजाताताई गुरव, विश्वनाथ कुलकर्णी, योगीनाथ फुलारी, विकास पाटील, युवराज पुजारी, प्रदीप महासागर, शहाजी चराटे, दिनकर मोक्ताई, किशोर क्षिरसागर, नागेश काळे, मोहन गुरव, श्रीकांत गुरव, देवा गुरव, नितीन पुजारी, शामभेर गुरव, सतीश गुरव आणि शरद पुजारी यांचा समावेश आहे.
देवस्थान इनाम जमीनधारकांच्या प्रश्नावर शासनाने तातडीने निर्णय घेऊन राज्यभर एकसमान नियम लागू करावेत, अन्यथा या प्रश्नासाठी राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post