सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापूर शहर गुन्हे शाखेने अत्यंत वेगवान आणि कौशल्यपूर्ण कारवाई करत जबरी चोरी प्रकरणातील पर-जिल्ह्यातील आरोपीला अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल १ लाख ३७ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून, पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.दि. २९ एप्रिल २०२६ रोजी सलगर वस्ती परिसरात घडलेल्या घटनेत फिर्यादीची आई इंदुमती साठे या घराच्या पोर्चमध्ये झोपलेल्या असताना अज्ञात इसमाने मध्यरात्री त्यांचे तोंड दाबून घातक हत्याराने गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सुमारे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी असलेले पोत जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आले. या प्रकरणी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. शंकर धायगुडे व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला.तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, एक संशयित इसम चोरीचे सोने विक्रीसाठी सराफ बाजारात येणार असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सिद्धेश्वर मंदिर परिसरात संशयिताला पकडले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शकील उदाशा भोसले (वय २०, रा. कोळगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) असे आहे.आरोपीकडून ८ ग्रॅम सोन्याचे मणी तसेच दोन जोड कर्णफुले जप्त करण्यात आली. पुढील चौकशीत आरोपीने आपल्या साथीदारांसह आणखी एका जबरी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. बेलाटी-मंगळवेढा हायवे परिसरात काही महिन्यांपूर्वी घरात घुसून महिलांवर हल्ला करत दागिने लुटल्याचेही उघड झाले.या तपासात गुन्हे शाखेने एकूण २ गंभीर गुन्हे उघडकीस आणले असून, एकूण १३.०३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त गौहर हसन, डॉ. अम्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजन माने व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स.पो.नि. शंकर धायगुडे यांच्या नेतृत्वाखालील पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली.
