अक्कलकोट (प्रतिनिधी)-स्वामी समर्थांच्या अवतार कार्यावर आधारित आणि दिग्दर्शक प्रविण तरडे निर्मित ‘देऊळ बंद’ या गाजलेल्या मराठी चित्रपटानंतर आता ‘देऊळ बंद-२’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, त्याच्या टीझरचे भव्य अनावरण आज श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर येथे मोठ्या भक्तीभावात संपन्न झाले.या अनावरण सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, दिग्दर्शक-अभिनेते प्रविण तरडे, अभिनेत्री स्नेहल तरडे, निर्माते कैलाश वाणी, जयश्री वाणी, कैवल्य वाणी, जुईली वाणी यांच्यासह मंदिर संस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. महेश इंगळे आणि प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते ऑनस्क्रीन बटन दाबून टीझरचे अनावरण करण्यात आले.
यावेळी बोलताना ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी सांगितले की, “स्वामी समर्थांची भूमिका साकारणे हे माझ्यासाठी मोठे आशिर्वाद आहे. ‘देऊळ बंद-२’मध्ये शेतकरी कुटुंबाने घेतलेली देवाची परीक्षा हा भावनिक आणि अद्भुत विषय मांडण्यात आला असून, हा चित्रपट स्वामी भक्तांच्या मनाला नक्कीच भिडेल.” त्यांनी २१ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा हा चित्रपट आवर्जून पाहण्याचे आवाहन केले.
दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी मनोगतात सांगितले की, “स्वामी समर्थांनी मला भक्तीमार्ग दाखवला. ‘देऊळ बंद’ मालिकेचे एकूण ११ भाग निर्माण करण्याचा मानस असून, ‘देऊळ बंद-२’ हा त्यातील पुढचा टप्पा आहे. स्वामी भक्तांकडून या चित्रपटालाही भरभरून प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आहे.”
मंदिर संस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी सांगितले की, “‘देऊळ बंद’ हे शीर्षक श्रद्धा आणि अश्रद्धा यांच्या संघर्षाचे प्रतीक आहे. पहिल्या भागात भक्ताची परीक्षा होती, तर दुसऱ्या भागात देवाची परीक्षा हा मुख्य गाभा आहे. प्रविण तरडे यांनी अत्यंत विचारपूर्वक हे कथानक उभे केले असून, स्वामी समर्थांची कृपा त्यांच्या कार्यावर कायम आहे.”
या कार्यक्रमास मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, मंदार महाराज पुजारी, प्रा. शिवशरण अचलेर, कोरिओग्राफर नंदकुमार जाधव, कुणाल मांजरेकर, चैतन्य दळवी, प्रद्युम्न जोशी, अभियंता नवनाथ बनकर, सुनील नाईकवडी, सागर गोंडाळ, रमेश शिंदे, विपूल जाधव, श्रीकांत मलवे, सुनील पवार, ओंकार महाडीक, अविनाश क्षीरसागर आदींसह ‘देऊळ बंद-२’ चित्रपटाची संपूर्ण टीम व स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कै. कल्याणराव इंगळे सभामंडप येथे आयोजित ‘देऊळ बंद-२’ चित्रपटाच्या टीझर अनावरण सोहळ्यावेळी महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, प्रविण तरडे, अभिनेत्री स्नेहल तरडे, निर्माते कैलाश वाणी, जयश्री वाणी, कोरिओग्राफर नंदकुमार जाधव व अन्य मान्यवर उपस्थित होते.
Tags:
सोलापूर जिल्हा