अन्यायग्रस्तास न्यायाऐवजी दडपशाही? वळसंग पोलीस ठाण्याच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

 


सोलापूर (प्रतिनिधी)- अन्यायग्रस्ताला न्याय मिळवून देण्याऐवजी अन्याय करणाऱ्यांनाच पाठीशी घालून पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करणाऱ्या वळसंग पोलीस स्टेशनमधील संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष शाम क्षिरसागर यांनी महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह विभाग) आणि पोलीस महासंचालकांकडे केली आहे. या प्रकरणामुळे वळसंग पोलीस स्टेशनच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मौजे लिंबीचिंचोळी, ता. दक्षिण सोलापूर येथील शेतकरी अंबाजी सिताराम कोळी यांनी आपल्या शेतजमीन आणि घर बळकावण्याच्या उद्देशाने त्यांचे भाऊ शरणप्पा सिताराम कोळी यांनी १२ मार्च २०२५ रोजी मारहाण व शिवीगाळ केल्याची तक्रार केली होती. मात्र, वळसंग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवून घेण्यास नकार देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, गावचे पोलीस पाटील आणि संबंधित व्यक्तींमधील निकट संबंधांमुळे पोलिसांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले. परिणामी, अंबाजी कोळी यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच विविध प्रशासकीय स्तरावर लेखी तक्रारी दिल्या. परंतु, संबंधित तक्रारींवर अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.याच काळात तत्कालीन पोलीस अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांनी दबाव टाकत धमकावल्याचा, तसेच खोटे गुन्हे दाखल करून मानसिक त्रास दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर एका घटनेत पोलीस वाहनाने धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचाही गंभीर आरोप तक्रारदारांनी केला आहे.प्रकरण अधिक गंभीर झाले ते ३० नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या कथित प्राणघातक हल्ल्यानंतर. अंबाजी कोळी व त्यांच्या पत्नीवर कुऱ्हाड आणि लोखंडी रॉडने हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. उपचारानंतर पुन्हा पोलीस ठाण्यात गेल्यावरही योग्य प्रतिसाद न मिळता, उलट तक्रार मागे घेण्यासाठी दबाव व खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्याचा दावा करण्यात आला आहे.दरम्यान, माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवलेल्या सीसीटीव्ही फुटेजसंदर्भातही संशयास्पद उत्तर देण्यात आल्याचा आरोप आहे. अर्जाच्या तारखांमध्ये विसंगती असल्याचे निदर्शनास आणून देत, माहिती अधिकार कायद्याची खिल्ली उडविण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने या सर्व घटनांची निष्पक्ष व खातेनिहाय चौकशी करून संबंधित विद्यमान व तत्कालीन पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच गावच्या पोलीस पाटलाविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, अशा प्रकारच्या घटनांमुळे पोलीस यंत्रणेवरील सर्वसामान्यांचा विश्वास ढासळत असल्याची टीकाही करण्यात आली.पत्रकार परिषदेत मुख्य तक्रारदार अंबाजी सिताराम कोळी, तसेच फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते राजा सोनकांबळे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post