सोलापूर (प्रतिनिधी)- उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी आज (दि. 27 जुलै) सकाळी 11.00 वाजल्यापासून भीमा नदीपात्रात एकूण 6,600 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.धरण व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उजनी धरण सध्या 93.87 टक्के भरले असून, सांडव्यावरील वक्रद्वारांद्वारे 5,000 क्युसेक्स आणि विद्युतगृहामधून 1,600 क्युसेक्स, असा एकूण 6,600 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. परिस्थितीनुसार या विसर्गामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.या पार्श्वभूमीवर भीमा नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीपात्रात कोणीही उतरू नये, तसेच नदीकाठावर असलेली जनावरे, शेतीची साधने किंवा इतर साहित्य तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सखल भागातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता इंजि. सु. उ. डुंबरे यांनी केले आहे.
