सोलापूर (प्रतिनिधी)- श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित सिद्धेश्वर प्रशालेत ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत १३ ते १५ ऑगस्टदरम्यान विविध उपक्रमांसह स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. १५ ऑगस्ट रोजी एस.एस.सी. मार्च २०२६ बोर्ड परीक्षेत प्रशालेच्या मराठी माध्यमातून प्रथम क्रमांक मिळविणारा चि. जय दीपक जन्मले आणि कन्नड विभागातून प्रथम आलेली कु. कलावती चंद्रकांत बुजरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष राहुल सुगंधी होते. त्यांनी प्रशालेतील गुणवंत विद्यार्थी, शिक्षकवृंद व अधिकारी वर्गाचे अभिनंदन केले. यावेळी वंदे मातरम्, राष्ट्रगीत, राज्यगीत व ध्वजगीताचे सामूहिक सादरीकरण करण्यात आले. ध्वजप्रतिज्ञा, प्रतिज्ञा व संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन तसेच वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विद्यार्थ्यांनी ‘भारत प्यारा देश हमारा’ हे देशभक्तीपर समूहगीत सादर केले. एनसीसी विभागप्रमुख संजयकुमार कोरे यांनी एनसीसी विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा दिली.पर्यवेक्षक विनोद बिराजदार यांनी उपस्थितांचे स्वागत करून स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व विशद केले. स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य जपणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. भारत विज्ञान, तंत्रज्ञान, अंतराळ, शिक्षण, क्रीडा व संरक्षण क्षेत्रात प्रगती करत असून युवा शक्ती देशाच्या विकासाची नवी दिशा ठरवत आहे, असेही त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी संविधानाचा आदर, राष्ट्रनिष्ठा आणि प्रामाणिकपणा जपावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी एस.एस.सी. बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांसह इयत्ता पाचवी ते नववीच्या वार्षिक परीक्षेत उत्कृष्ट यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच ‘अवंतिका नॅशनल आर्ट कॉम्पिटिशन, नवी दिल्ली २०२६’ मधील बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘National Symbols and Historical Places’ या हस्तलिखित प्रकल्पाचे प्रकाशन करण्यात आले. नागराज दिंडोरे, शौर्य रंगापुरे व बजरंग देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कवायतीचे संचालन करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक राजकुमार उंबरजे, गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक रामचंद्र लंगोटे व दीपक जन्मले, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विभागप्रमुख, एनसीसी विद्यार्थी, पालक आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख रविंद्र कबाडे यांनी केले. बक्षीसपात्र विद्यार्थ्यांची यादी रूपाली स्वामी व सोनाली जवळे यांनी वाचली, तर प्रमोदिनी स्वामी यांनी आभार मानले.

