लाच स्वीकारल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यास जामीन

सोलापूर-पाच हजारांची स्वीकारल्याप्रकरणी लाच पोलीस कर्मचाऱ्यास सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाद्वारे पोलीस कर्मचारी दादासाहेब बोडके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस कर्मचारी बोडके यांनी गुन्हा दाखल न करण्यासाठी फिर्यादीकडून पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली असता यातील फिर्यादीने अँटी करप्शन ब्यूरो कार्यालय सोलापूर येथे आरोपीविरुद्ध तक्रार केली व त्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळा रचला होता. तद्नंतर फिर्यादीने आरोपीस अक्कलकोट पंचायत समिती येथे बोलावून पाच हजार रुपये दिले असता सापळा पथकातील अधिकाऱ्यांनी पोलीस कर्मचारी बोडके यांना अटक केली होती. त्यानंतर आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी आरोपीच्या वकिलाने केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांनी आरोपीला जामीन मंजूर केला. यात आरोपीतर्फे अॅड. कदीर औटी, अॅड. दत्तात्रय कापुरे, अॅड. इम्रान पाटील, अॅड. सोहेल रामपुरे यांनी काम पाहिले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form