मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडून विविध विभागांचा आढावा

दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्हास्तरीय समन्वय समिती, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिती, 108 रुग्णवाहिकांच्या सेवाबाबत, एनटीसीपी समन्वयक समिती, जिल्हास्तरीय दक्षता समिती, कृष्ठरोग शोध मोहिम आणि स्पर्श अभियान सीएस तसेच जिल्हास्तरीय स्थायी लेखा परिक्षण समिती अशा विविध विभागांच्या कामकाजाचा बैठकीद्वारे आढावा घेऊन सर्व संबंधित विभागाने आरोग्य विभागाच्या विविध योजनांची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.
           यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, डीपीओ भगवान भुसारी, सहायक संचालक आरोग्य सेवा (कृष्ठरोग) डॉ. मोहन शेगर, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिनाक्षी बनसोडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. आनंद गोडसे, वैदकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्रीमती वैशाली थोरात, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीमती वंदना शिंदे, पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
    समाजात असलेल्या प्रत्येक संशयित कुष्ठरुग्णांचा शोध पथकामार्फत शोध घेऊन त्याचे निदान निश्चित करणे व निदान झालेल्या कुष्ठरुग्णांना तात्काळ बहुविध औषधोपचार सुरु करण्यासाठी केंद्र शासनाने कुष्ठरोग अभियान सुरु केले आहे. हे अभियान 14 दिवसाचे असणार आहे. या अभियानात राज्यातील 20 जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील या 14 दिवसाच्या अभियानासाठी 36 लाख 57 हजार 590 लोकसंख्येची निवड करण्यात आली असून 2768 शोधपथके तयार करण्यात आली आहेत. शोध पथकाने शोधलेल्या प्रत्येक संशयीताची तपासणी वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून करण्यात येणार आहे. या अभियान दरम्यान तपासणी करण्याकरीता येणाऱ्या पथकाकडून तपासणी करुन घेऊन सहकार्य अरावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जंगम यांनी केले आहे.
    एचआयव्ही एड्स रुग्ण संख्या, उपचार पध्दत, टीबी तपासणी, औषधोपचार बाबत बैठकीत चर्चा झाली. एचआयव्ही पॉझिटीव्ह रुग्णांना सामाजिक सुरक्षा बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जंगम यांनी मार्गदर्शन केले. हाय रिक्स ग्रुप मधील महिलांना घरकुल योजना, संजय गांधी निराधार योजना, बाल संगोपन योजना साठी आवश्यक कागदपत्रांच्या अडचणी सोडविण्यासाठी कॅम्प आयोजित करण्याच्या सूचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जंगम यांनी दिल्या.
     जिल्हास्तरीय स्थायी लेखा परिक्षण बैठकीत लेखा परिक्षणात आढळून आलेल्या आक्षेपांची पूर्तता करुन लवकरात लवकर ऑडिट पॅरे निकाली काढावेत. लेखा परिक्षणात वसुली असेल तर तात्काळ वसुलीबाबतची कार्यवाही पूर्ण करावी, अशा सूचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जंगम यांनी बैठकीत दिल्या.
         मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जंगम यांनी विविध विभागाच्या अडचणी समजावून घेतल्या. अडचणी तात्काळ दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, याबाबत सर्व विभागांना आश्वस्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form