दैनिक_लोकशाही_मतदार
करमाळा(प्रतिनिधी)-विशाल जाधव- अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून हेक्टरी दोन लाखांची भरपाई शेतकऱ्यांना द्या, अशी मागणी करमाळा मतदार संघाचे आमदार नारायण पाटील यांनी केली आहे. जिल्हाधिकारी यांना याबाबत एक लेखी निवेदन आ. पाटील यांच्या कडून पाठवले गेले आहे. याबाबत अधिक माहिती देताना आ. पाटील यांनी सांगितले की, करमाळा मतदार संघात गेले दहा दिवस अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यामुळे कांदा, केळी, डाळींब, द्राक्षे, आंबा बासह अनेक पिके व फळबागाचे तसेच भाजीपाला म्हणजेच तरकारीचे ही सर्वात जास्त नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या पावसाने शेतातील उभी पिके हातातुन गेलीच, परंतू अनेक ठिकाणी वादळ वाऱ्यामुळे फळबागांची प्रचंड प्रमाणात नुकसानी झाली आहे. बामुळे महसुल व कृषी विभागाने एकत्रित येऊन करमाळा मतदार संघातील नुकसान झालेल्या भागात पाहणी करावी. नुकसान झालेल्या पिकांचे जागीच पंचनामे केले जावेत. व तसे अहवाल तथा नुकसानीचे प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत. जेणेकरून शेतकऱ्यांना याबाबतची नुकसान भरपाई मिळत असताना अडचण येणार नाही व दिरंगाई होणार नाही. साधारणपणे करमाळा तालुक्यातील केळी व कांदा बासह इतर पिकांच्या उत्पादनात आता घट होईल असे दिसुन येते. यामुळे शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई दिली जावी. अशी मागणी आ. पाटील यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी यांचेसह कृषी मंत्री, महसुल मंत्री, पालकमंत्री आदिना पाठवण्यात आल्या आहेत.
Tags
करमाळा