दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता शरणू शिवराय हांडे (वय ३६, रा. साईनगर, अक्कलकोट रोड) यांचे अपहरण करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अटक केलेल्या सातजणांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कुलकर्णी यांनी दिला. अंतर्गत वादातून हे प्रकरण घडल्याचे तपासात समोर आले आहे.
अमित म्हाळप्पा सुरवसे (वय २९, रा. मणिधारी सोसायटी, अक्कलकोट रोड), सुनील भीमाशंकर पुजारी (वय २०, रा. साईबाबा चौक), दीपक जयराम मेश्राम (वय २३, रा. लोकमंगल हॉस्पिटलजवळ, आशानगर), अभिषेक गणेश माने (वय २३, रा. एकतानगर), राकेश भीमाशंकर कुदरे (वय २१, रा. मुमताज नगर), श्रीकांत बाबूराव सुरपुरे (वय २४, रा. सिध्दरामेश्वर नगर, एमआयडीसी) व समर्थ वासुदेव भैरी (वय १९, रा. नीलमनगर) अशी न्यायालयीन कोठडी मिळालेल्या सातजणांची नावे आहेत.शरणू हांडे यांचे राज बिअर शॉपीच्यामागे समाधान नगररोड येथून चारचाकी वाहनातून अपहरण केले. याची तक्रार त्यांचा भाऊ विष्णू हांडे यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली. त्यानंतर पोलिसांच्या पथकांनी वाहनाचा पाठलाग वाहनामधून अपहरण झालेल्या शरणू हांडे व अपहरणकर्त्यांना होर्ती येथून ताब्यात घेतले होते. तसेच अपहरणासाठी वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची कार (एमएच १२ एक्सएक्स ६५४७) हस्तगत केली होती. हांडे यांच्या पायावर धारदार हत्याराने आरोपींनी वार केले होते. जखमी झालेल्या हांडे यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अटकेतील सातजणांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता सुरवसे व सुरपुरे यांना पोलिसांनी न्यायालयात पोलीस कोठडीची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने सर्वांना न्यायालयीन कोठडी दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रशांत वाघमारे, विजय खोमणे हे करीत आहेत. यात आरोपींतर्फे अॅड. शरद पाटील हे काम करीत पाहात आहेत
Tags
सोलापूर