एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्त " इम्तियाज " नावाच्या व्यक्तींना ५ लिटर मोफत पेट्रोल किंवा औषधे : महिलांचाही होणार सन्मान : एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांची घोषणा !

दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी) - एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार ९ ऑगस्ट रोजी सात रस्ता येथील कारीगर पेट्रोल पंप येथे 
 " इम्तियाज " नावाच्या व्यक्तींना मोफत ५ लिटर पेट्रोल किंवा औषधे देण्यात येणार आहेत. तसेच महिलांचाही विशेष सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
   प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांचा वाढदिवस १० ऑगस्ट रोजी आहे. परंतु ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता सात रस्ता येथील कारीगर पेट्रोल पंपावर " इम्तियाज " नावाच्या व्यक्तींना ५ लिटर पेट्रोल किंवा औषधे मोफत देऊन तसेच राखी पौर्णिमा असल्याने महिलांचा सन्मान करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
   ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक मौलाली उर्फ बाबा मिस्त्री यांच्या हस्ते होणाऱ्या कार्यक्रमास एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण, मुंबईचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष फारूक शाब्दी,माजी सभापती रियाज हुंडेकरी, माजी नगरसेवक तौफिक हत्तुरे, गाजी जागीरदार,अझर हुंडेकरी, वाहेदा भंडाले आणि ग्रामीण व शहराचे कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे. 
    पाच लिटर पेट्रोल किंवा गरजेनुसार पाचशे रुपयाचे मोफत औषध मोफत देण्यात येणार आहे.
 तसेच सोलापूर शहरातील सर्वधर्मीय १०० कुटुंबीयांना मोफत पत्रे वाटप करण्यात येणार आहेत. शनिवार ९ ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम होणार आहे.ज्या सर्वधर्मीय २५ महिलांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी सकाळी १० ते ११ ही वेळ ठेवण्यात आली आहे. त्यांनाही ५ लिटर मोफत पेट्रोल देण्यात येणार आहे. " इम्तियाज " नावाच्या व्यक्तींसाठी वाहनाचे लायसन तसेच आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे वाहन नाही, परंतु नाव मात्र " इम्तियाज जलील " आहे. अशा व्यक्तींनाही ५ लिटर मोफत पेट्रोलचा लाभ मिळणार असल्याचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी सांगितले 
 तत्पुर्वी ८ ऑगस्ट रोजी ऑफिसर्स क्लब जवळील राजमहल गार्डन येथे रक्तदान शिबिर आणि हिजामा कॅम्पचे आयोजन करण्यात आले असल्याचेही जिल्हाध्यक्ष पठाण यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
पत्रकार ते खासदार थक्क करणारा प्रवास- शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या संभाजीनगर मतदारसंघांमध्ये २०१९ मध्ये सलग चार टर्म शिवसेनेचे खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे यांचा पराभव करून एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील जायंट किलर ठरले. २३ वर्षे पत्रकारिता केल्यानंतर राजकारणात प्रवेश केलेल्या इम्तियाज जलील यांनी आपल्या खासदारकीच्या कालावधीत संभाजीनगरमध्ये विकास कामांचा धडाका सुरू केला. राजकारण आणि समाजकारणाची त्यांना जाण असल्यामुळे तसेच संभाजीनगरमध्ये मुस्लिम समाजाचे नेतृत्व पुढे आणण्याच्या दृष्टीने इम्तियाज जलील अत्यंत महत्त्वाचे नेते ठरले.पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर मध्य मतदारसंघातून शिवसेनेच्या प्रदीप जयस्वाल यांचा पराभव करून इम्तियाज जलील सर्वप्रथम आमदार आणि त्यानंतर संभाजीनगरचे खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास वाखाणण्याजोगा आहे. पत्रकारिता करत असताना इम्तियाज जलील एमआयएम पक्षाचे तेलंगणा आणि हैदराबादमधील काम पाहून प्रभावित झाले होते. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली एमआयएमची मोठी भरभराट झाली आहे. १० ऑगस्ट रोजी प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांचा वाढदिवस आहे. एमआयएमला सक्षम नेता मिळाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी सोलापुरात " इम्तियाज " नावाच्या व्यक्तींसाठी नवोपक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form