दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- शिक्षकांच्या शालार्थ आयडी देण्याच्या प्रकरणामध्ये काही अधिकाऱ्यांनी अनियमितपणा करून भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवून अनेक अधिकाऱ्यांना अटक केली जात आहे. या विरोधात शुक्रवार दि. ८ ऑगस्टपासून अखिल महाराष्ट्र शिक्षणसेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने बेमुदत रजा आंदोलन पुकारले आहे.
या आंदोलनात राज्यातील बहुतांश शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी यांच्यासह शिक्षण विभागातील कर्मचारी सहभागी होणार आहेत.अधिकाऱ्यांची चौकशी न करता तक्रार आली म्हणून अनेक अधिकाऱ्यांना अटक केली. या प्रकाराला अखिल महाराष्ट्र शिक्षणसेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने विरोध दर्शविला आहे. या आंदोलनास महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाने पाठिंबा दर्शविला आहे.पवित्र पोर्टल मार्फत झालेली शिक्षक भरती आणि त्यांचे शालार्थ, शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यता, अल्पभाषिक व अल्पसंख्यांक शाळामधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यता, सेवक संच दुरुस्ती अशी अनेक कामे सध्या प्रलंबित असताना अधिकाऱ्यांच्या अटक सत्रामुळे कोणतेही अधिकारी नियमित असणारी ही कामे सुद्धा करायला सध्या धजावत नाहीत. म्हणून राजपत्रित अधिकाऱ्यांच्या या बेमुदत रजा आंदोलनास पाठिंबा देण्याची भूमिका महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने व सचिव नंदकुमार सागर यांनी पत्रक काढून घेतली आहे.
Tags
सोलापूर