डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातच शाश्वत विकास ध्येयांचे प्रतिबिंब- डॉ. सुधीर गव्हाणे ; सोलापूर विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप


सोलापूर (प्रतिनिधी)- संयुक्त राष्ट्र संघटनेने स्वीकारलेल्या शाश्वत विकासाच्या ध्येय धोरणांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्पष्ट प्रतिबिंब दिसते. जगाला दिलेली परिवर्तनाची मोठी देणगी असल्याचे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुधीर गव्हाणे यांनी केले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुल, प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘कोट्यावधी मनाला स्पर्श करणारे मन: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारांचे जागतिक संदर्भ’ या महत्त्वपूर्ण विषयावर ही आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी डॉ. गव्हाणे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. लक्ष्मीकांत दामा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर उपस्थित होते.
यावेळी डॉ. सुधीर गव्हाणे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे जगाच्या अनेक गंभीर प्रश्नांची उत्तरे असून, डॉ. आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचा गाभा सामाजिक न्याय, समानता आणि सर्वांना विकासाची संधी या मूलभूत मूल्यांवर आधारित आहे. संयुक्त राष्ट्रांची विशेषतः गरीबी निर्मूलन, दर्जेदार शिक्षण, लिंग समानता, मानवी हक्क आणि समावेशक विकास यांसारखी ध्येये - आंबेडकरांनी आयुष्यभर केलेल्या कार्याची आणि मांडलेल्या विचारांचीच पुढची पायरी आहेत. डॉ. आंबेडकरांनी मांडलेली ’अस्पृश्यता’, जात-भेद’ आणि वर्ग-संघर्ष’ यांसारख्या समस्यांवरील उत्तरे आज जागतिक स्तरावर गरीबी, असमानता आणि मानवी विकासातील अडथळ्यांवर मात करण्यासाठी मार्गदर्शक ठरत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समानता, न्याय आणि लोकशाही यावर आधारित विचार केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी शाश्वत विकास आणि मानवी कल्याणाचा पाया आहेत. त्यांच्या विचारांना संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून जागतिक स्तरावर मूर्त स्वरूप मिळत आहे. असेही डॉ. गव्हाणे यांनी स्पष्ट केले. यावेळी स्वामी रामानंद तिर्थ मराठावाडा विद्यापीठातील माध्यम संकुलाचे संचालक राजेंद्र गोणारकर आणि डॉ. रविंद्र चिचोलकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेचे जागतीक संदर्भ या विषयावर मांडणी केली. अमेरिका येथील टेक्सास विद्यापीठातील डॉ. स्कॉट स्ट्राऊड मार्गदर्शन केले.
 यावेळी बोलताना विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. लक्ष्मिकांत दामा म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी देशाला केवळ राज्यघटना दिली नाही, तर जगाला सर्व समावेशक विकासाची आणि लोकशाही मूल्यांची अनोखी प्रेरणा दिली. त्यांनी नेहमीच विकासाचे लाभ समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला आहे.
यावेळी संचालक डॉ गौतम कांबळे यांनी सामाजिक शास्त्रे संकुलाच्या कार्याचा आढावा, आंतरराष्ट्रीय परिषदेची भुमिका आणि वाटचाल स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले. आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी होण्यासाठी डॉ. तारिक तांबोळी, प्रा. विठ्ठल एडके, विष्णु खडाखडे, विक्रम बरडे, राम भोसले, आर. एम. मंडलिक, राजेंद्र म्हणाणे, डॉ. संतोष काळे, डॉ. श्रीनिवास भंडारे, डॉ. हजिमलंग शेख, डॉ. मधुकर जक्कन, डॉ. सचिन शिंदे, हर्षल शिंगे, डॉ. वर्षा भोसले, डॉ. ज्ञानेश्वरी हजारे, डॉ. स्नेहल नस्टे, डॉ. अश्विनी पांढरे, डॉ. नम्रता ढाले, भैरवनाथ भुसारे, बालाजी सग्गम, बसवराज लंगोट, राजेश पाटील आणि लिपीक महेश कोळी यांनी परिश्रम घेतले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सागर राठोड यांनी केला, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. अंबादास भासके तर आभार डॉ. तेजस्वीनी कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक आणि नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form