रांची (झारखंड)|सोलापूर - येथे दि. ६ ते १० जानेवारी २०२६ या कालावधीत पार पडलेल्या ६९ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत आर्चरी – रिकर्व्ह या क्रीडा प्रकारात श्रीमती निर्मलाताई ठोकळ कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या कु. प्रगती शिंदे हिने उल्लेखनीय यश संपादन केले. १७ वर्षां खालील वयोगटात पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करत तिने या स्पर्धेत सुवर्ण व कांस्य अशी दोन पदके पटकावत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड अमरावती येथे दि. १८ ते २० डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेतील दमदार कामगिरीच्या जोरावर झाली होती. या राज्यस्तरीय स्पर्धेत कु. प्रगती शिंदे हिने आर्चरी – रिकर्व्ह प्रकारात पुणे विभागाकडून खेळताना एकूण चार पदकांची कमाई केली होती. यामध्ये एक सुवर्णपदक, एक रौप्यपदक आणि दोन कांस्यपदकांचा समावेश होता. या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिची महाराष्ट्र संघातून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. राष्ट्रीय पातळीवरही आपल्या खेळातील सातत्य, अचूक नेमबाजी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिने सुवर्णपदक पटकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या या यशामागे पुणे येथील तज्ज्ञ मार्गदर्शक श्री. रंजित चामले तसेच महाविद्यालयाचे क्रीडा मार्गदर्शक श्री. सुरवसे ए. पी. यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.कु. प्रगती शिंदेच्या या देदीप्यमान यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विपिन ठोकळ, उपाध्यक्ष सचिन ठोकळ, सचिव भिकाजी गाजरे, संचालिका श्रीमती शिल्पाताई ठोकळ तसेच प्राचार्य डी. डी. गाजरे यांनी तिचे अभिनंदन करून पुढील क्रीडा वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

