सोलापूर (प्रतिनिधी)-'कर्नाटकचे डॉ. आंबेडकर' या नावाने गौरविले जाणारे ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, साहित्यीक आणि वचनकार कुमार कक्कय्या पोळ यांच्या बहुचर्चित सनातन धर्मदर्शन' या पुस्तकाचे शनिवार दि.२८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात प्रकाशन होत असल्याची माहिती सच्चिदानंद व्हटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे राहणार आहेत. ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ समिक्षक डॉ.प्रा.श्रीपाल सबनीस यांच्याहस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या प्रसंगी नागठाणचे आमदार विठ्ठल कटकधोंड. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष तथा उद्योगपती दत्ताअण्णा सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.पुस्तकाचे अनुवादक चन्नवीर भद्रेश्वरमठ, प्रगती प्रकाशनचे संचालक दत्ता थोरे सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा गीता अमोल शिंदे, सचिव राजश्री लक्ष्मीदास सोनकवडे, कुमार कक्कया पोळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष चिदानंद पोळ यांच्यासह इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुस्तक प्रकाशन सोहळा होत आहे. या पुस्तकाचे प्रकाशन सोलापूरच्या सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानने केल्याचे व्हटकर यांनी सांगितले.या पत्रकार परिषदेला अशोक आगावणे, फारुक शेख, लक्ष्मीदास सोनकवडे हे मान्यवर उपस्थित होते.

