सोलापूर- दि. ११ मार्च २०२६ रोजी मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडी येथे विकसित होत असलेल्या ग्रामीण पर्यटन उपक्रमाची पाहणी प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कुलदीप जंगम यांनी केली. मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत अभियानांतर्गत गावातील विविध विकासकामांसोबतच ग्रामीण पर्यटनाच्या संकल्पनेची माहिती देण्यात आली.
यावेळी पंचायत समिती मंगळवेढा येथील गटविकास अधिकारी डॉ. जास्मिन शेख, विस्तार अधिकारी नलवडे, गटशिक्षणाधिकारी दर्शन मेहता, उपकृषी अधिकारी प्रशांत काटे तसेच महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव उपस्थित होते.
पाहणीदरम्यान शिक्षण, आरोग्य, शेती, महिला बचत गटांचे उपक्रम, अंगणवाडीची स्थिती, गावातील नाविन्यपूर्ण उपक्रम, ग्रामीण जीवनशैली, पारसबाग तसेच भालेवाडी येथे विकसित होत असलेल्या ग्रामीण पर्यटन उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पर्यटनासाठी विकसित करण्यात आलेल्या हुरडा पार्टीच्या ठिकाणांची तसेच निसर्गरम्य परिसराची पाहणीही मान्यवरांनी केली.
यावेळी शेतात तयार झालेल्या ताज्या ज्वारीपासून पारंपरिक पद्धतीने हुरडा भाजण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मान्यवरांनी शिवारफेरी करत पारसबाग, शेतातील पिकांची स्थिती तसेच पर्यटनासाठी उपलब्ध असलेल्या विविध स्थळांची पाहणी केली. हिरवेगार शिवार, पिके, झाडे व निसर्गरम्य वातावरणामुळे उपस्थितांनी ग्रामीण जीवनाचा अनुभव घेतला.
या प्रसंगी कार्यक्रमाचे समन्वयन ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी केले तसेच तालुका व्यवस्थापक (उमेद) उमेश डांगे, डॉ. बुगडे, कृषी अधिकारी अभिजीत तावदारे, सुजित गायकवाड (बांधकाम विभाग), केंद्रप्रमुख रावसाहेब सूर्यवंशी, सरपंच डॉ. श्रीकांत दवले, उपसरपंच उषा गवळी, मुख्याध्यापक तानाजी कळकुंबे,कृषी पर्यटन तज्ज्ञ रमेश खळदकर, संवाद तज्ज्ञ नितीन सुकळीकर तसेच क्षेत्र समन्वयक भूषण महाजन तसेच अंगणवाडी सेविका, बचत गट प्रतिनिधी व पर्यटन समिती सदस्य असे सुमारे ५६ ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags:
सोलापूर