सोलापूर (प्रतिनिधी)-अर्ध्या तासात घरी येतो, असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या जीम ट्रेनरचा मृतदेह चौदा दिवसांनी सैफुलजवळील काटेरी झुडपात रबरी पाईपने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. सचिन मच्छिंद्र माने (वय ३०, रा. विजापूर नाका, २ नंबर झोपडपट्टी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मृत सचिन हा १४ मार्चपासून घरातून बेपत्ता होता. याबाबत कुटुंबियांनी तो हरवल्याची फिर्यादही दिली होती. सचिनने आपण आत्महत्या करणार असल्याचे स्टेटस ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली. सचिन हा शनिवार, १४ मार्च रोजी पत्नी कल्याणी यांना आपण अर्ध्या तासात घरी येणार आहे, तोपर्यंत कैरीचे लोणचे आणि भाजी बनव, असे सांगून गेला. घरातून गेल्यापासून त्याचा मोबाईल बंदच झाला. यामुळे कुटुंबियांनी याबाबत विजापूर नाका पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.
पण तो शुक्रवार, २७ मार्च रोजी सकाळी मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. सचिनवर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. सचिनच्या पश्चात पत्नी कल्याणी, तीन वर्षांची मुलगी ओजस्वी, दीड वर्षांचा मुलगा पार्थ आहेत. सचिनचे मोबाईल शॉपीचे दुकान होते. शिवाय जीम ट्रेनर असल्याने त्याचे अनेक प्रशिक्षणार्थी व नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, प्राथमिक अहवालामध्ये गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याचे आढळले आहे. याबाबतचा तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादा गायकवाड यांनी दिली.
प्रेमप्रकरणातून घटना-
मृत सचिन एका जीममध्ये ट्रेनिंग देत होता. तेव्हा त्याची ओळख एका महिलेसोबत झाली. त्यातून त्यांचे प्रेमसंबंध जुळले. या कारणावरून चार दिवसांपूर्वी त्याचा वाद झाला होता. त्यानंतर त्या महिलेच्या पतीने आणि भावाने सचिनचा खून केल्याचा आरोप पत्नी कल्याणी आणि नातेवाईकांनी केला आहे. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी करण्यात येत आहे
घटनास्थळी हे आढळले -
सैफुलजवळील एका खासगी हॉस्पिटलच्या पाठीमागील जंगलात जवळपास एक किलोमीटर दूर अंतरावर रात्री मृत सचिनची दुचाकी नातेवाईकांना दिसली. यामुळे त्यांनी सकाळी शोध सुरू केला. तेव्हा एका काटेरी झुडपात रबरी पाईपच्या सहाय्याने तो गळफास घेतलेल्या स्थितीत होता. पण त्याचा मृतदेह पूर्ण कुजलेला होता. तेथे जवळच त्याचा मोबाईल आणि चप्पल पडलेली होती. सचिनने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Tags:
सोलापूर