सोलापूर (प्रतिनिधी)-महाराष्ट्रात गुटखा व सुगंधी तंबाखूवर कठोर बंदी असतानाही सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत गुटखा, सुगंधी तंबाखू मिश्रित कच्चा व सुका मावा यांची खुलेआम विक्री सुरू असल्याचा गंभीर आरोप करत या विरोधात कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी युवा विकास सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, पुनम गेट येथे दिनांक 10 मार्चपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
राज्य शासनाने अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 (Food Safety and Standards Act) अंतर्गत गुटखा, सुगंधी तंबाखू मिश्रित पदार्थांच्या उत्पादन, साठवणूक व विक्रीवर बंदी घातली आहे. या कायद्याच्या कलम 26, 27 आणि 30 नुसार अशा पदार्थांची विक्री करणे दंडनीय गुन्हा आहे. तसेच भारतीय दंड संहिता कलम 272 व 273 नुसार आरोग्यास अपायकारक पदार्थांची विक्री करणे हा गंभीर गुन्हा असून दोषींवर कारवाईची तरतूद आहे. याशिवाय COTPA 2003 (सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा) अंतर्गतही कारवाई करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे.
तरीसुद्धा सोलापूर शहरातील अनेक पान टपऱ्या व किराणा दुकानांमध्ये बिनधास्तपणे गुटखा तसेच सुगंधी तंबाखू मिश्रित कच्चा व सुका मावा विकला जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. अनेक वेळा कारवाई झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात शहरात गुटखा विक्रीवर कोणताही आळा बसलेला नाही, अशी टीकाही आंदोलनकर्त्यांनी केली आहे.या संदर्भात 24 फेब्रुवारी रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे लेखी तक्रार देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झाला नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.शहरात काही व्यक्तींमार्फत मोठ्या प्रमाणात गुटखा व सुगंधी तंबाखूचा पुरवठा केला जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. यामध्ये कुंभार बेस परिसरातील राहुल सौदागर, विश्वनाथ अण्णा (एमआयडीसी), मानतेस गुब्याड (कुंभार बेस), रशीद शेटे (जेलरोड व एमआयडीसी), नेताजी (बाळी वेस), महेश खानोरे (एमआयडीसी) तसेच जुबेर कुरेशी व गंजी (जेलरोड परिसर),वांगी जेलरोड ( परिसर ) सोहेल कुरेशी.देवकुळे ( बिजापुर रोड )सचिन कोडी, धनलक्ष्मी ट्रेडर्स ( कुंभार बेस ),दयानंद ट्रेडर्स (कुंभार बेस ), यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.सोलापूर शहरातील प्रत्येक पान टपरी व किराणा दुकानात गुटखा व मावा सहज उपलब्ध होत असल्याने प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जोपर्यंत या सर्व पुरवठादार व विक्रेत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई होत नाही आणि शहरात गुटखा व मावाबंदीची प्रभावी अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.या आंदोलनात युवा विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख, मोहसीन बागवान, बंदेनवाज शेख, अकबर शेख, नागनाथ गणपा यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
