सोलापूर-दक्षिण सोलापूर- ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय कामांसाठी वारंवार तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागू नये आणि एकाच छताखाली सर्व दाखले व योजनांचा लाभ मिळावा, यासाठी दक्षिण सोलापूर तहसील कार्यालय सरसावले आहे. राज्याचे महसूलमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार आणि जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात ठिकठिकाणी 'समाधान शिबिरांचे' भव्य आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेची सविस्तर माहिती दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.या समाधान शिबिरांचे स्वरूप अत्यंत व्यापक असून, यामध्ये केवळ महसूल विभागच नव्हे, तर शासनाचे विविध २-३ विभाग एकत्रितपणे सहभागी होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील सुविधा पुरवल्या जाणार आहेत- नागरिकांना लागणारे उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल) इत्यादींचे जागीच वाटप. सातबाराचे वाचन करून 'जिवंत सातबारा' उपक्रम राबवण्यात येणार आहे, ज्यामुळे जमिनीच्या नोंदीतील त्रुटी दूर होतील. गरजू कुटुंबांना नवीन रेशनकार्डचे वाटप आणि रेशनकार्डमधील दुरुस्त्या व संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील पात्र लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेऊन त्यांना तात्काळ लाभ मिळवून देणे. असे या शिवरायाचे अजून करण्यात आले आहे.शेतकरी आणि सामान्यांसाठी विशेष आर्थिक लाभ - शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून या शिबिरात कृषी विभाग आणि बँकांचा सहभाग निश्चित करण्यात आला आहे. पात्र शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया या माध्यमातून राबवली जाईल. तसेच, आरोग्य विभागामार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित केले जाणार आहे.सहभागी होणारे विविध विभाग- या शिबिरात आरटीओ (RTO), मुद्रांक विभाग, महावितरण, महिला व बालविकास विभाग, ग्रामपंचायत विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोस्ट कार्यालय आणि सहकार विभाग आपले स्टॉल्स लावणार आहेत. यामुळे नागरिकांना वैयक्तिक लाभाच्या योजनांसोबतच सामूहिक विकास योजनांचीही माहिती मिळेल.
तहसीलदारांचे आवाहन- "शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा हाच या समाधान शिबिरांचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहून आपल्या कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी आणि प्रशासकीय पारदर्शकतेचा अनुभव घ्यावा," असे आवाहन तहसीलदार किरण जमदाडे यांनी केले आहे.
