आंतरजिल्हा दुचाकी चोरट्याचा सोलापुरात 'गेम'; गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या, १५ दुचाकी हस्तगत!

सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापूर शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोटार सायकली चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या गुन्ह्यांची गंभीर दखल घेत सोलापूर शहर गुन्हे शाखेने धडक कारवाई करत एका सराईत आंतरजिल्हा चोरट्याला जेरबंद केले आहे. त्याच्याकडून तब्बल ४ लाख ४५ हजार रुपये किमतीच्या १५ मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. सोलापूरचे पोलीस आयुक्त . एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त डॉ. अश्विनी पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त.राजन माने यांनी दिलेल्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पथक तपासात होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. शैलेश खेडकर आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केले.या दरम्यान, पोलीस अंमलदार इम्रान जमादार आणि संदीप जावळे यांनी संशयित आरोपीची ओळख पटवली. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, विष्णू घाट परिसरातील फूटपाथ जवळ एक इसम विना नंबर प्लेटची काळ्या रंगाची 'होंडा युनिकॉर्न' विकण्यासाठी थांबला होता. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.सचिन अंकुश कात्रे (वय ४० वर्षे, रा. बीड, मूळ रा. मसोबाची वाडी, जि. धाराशिव) असे आरोपीचे नाव आहे. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने ही मोटार सायकल सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिर येथून चोरी केल्याची कबुली दिली. अधिक तपासात त्याने गेल्या सहा महिन्यात सोलापूरसह अहिल्यानगर, बीड, जालना, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातून आणखी १४ मोटार सायकली चोरी केल्याचे मान्य केले. या धडक कारवाईमुळे अनेक जिल्ह्यांतील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.ही कामगिरी पोलीस आयुक्त . एम.राज कुमार, पोलीस उप-आयुक्त डॉ. अश्विनी पाटील आणि स.पो.आ.राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, स.पो.नि. शैलेश खेडकर, अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपुत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, वसीम शेख व पथकाने केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post