मौजे कोंडी–बीबी दारफळ येथे अवैध गौण खनिज उत्खननावर धडक कारवाई; ६ हायवा व १ पोकलँड जप्त


सोलापूर (प्रतिनिधी)-उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या पथकाने मौजे कोंडी, बीबी दारफळ परिसरात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननावर मोठी कारवाई करत ६ हायवा व १ पोकलँड यंत्र जप्त केले. ही कारवाई जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार निलेश पाटील यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित परिसरात बेकायदेशीररीत्या वाळू व इतर गौण खनिजांचे उत्खनन सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार महसूल पथकाने अचानक छापा टाकत ही कारवाई केली. कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री आढळून आली असून, ती ताब्यात घेण्यात आली आहे.जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये ६ हायवा ट्रक व १ पोकलँड मशीनचा समावेश आहे. या प्रकरणी संबंधितांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.तहसीलदार निलेश पाटील यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी यांच्या सूचनांनुसार अवैध खनिज उत्खननाविरोधात कठोर मोहीम राबविण्यात येत आहे. महसूल व पोलीस प्रशासन संयुक्तपणे कारवाई करत असून, भविष्यातही अशा बेकायदेशीर प्रकारांना आळा घालण्यासाठी सातत्याने धडक कारवाया केल्या जाणार आहेत.दरम्यान, या कारवाईमुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, प्रशासनाच्या या भूमिकेचे स्थानिक नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post