सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापुरातील सुप्रसिद्ध चित्रकार शेरशाह डोंगरी यांच्या 'कलाप्रवास' या विशेष चित्र प्रदर्शनाचे आयोजन २ एप्रिल ते ५ एप्रिल २०२६ या कालावधीत पु. ना. गाडगीळ अँड सन्स येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनात कलाकाराच्या एकूण ४० कलाकृती रसिकांसाठी प्रदर्शित होणार आहेत. विशेष म्हणजे, शेरशाह डोंगरी यांनी प्रवासादरम्यान प्रत्यक्ष साकारलेली निसर्गचित्रे या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत.या प्रदर्शनाचे उद्घाटन २ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता झपूर्झा आर्ट गॅलरी, पु. ना. गाडगीळ डफरीन चौक येथे प्रा. दीपक देशपांडे, चित्रकार तथा हास्यसम्राट यांच्या हस्ते करण्यात येणार असून प्रसिध्द उद्योगपती तथा सुरवसे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. राजकुमार सुरवसे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.चित्रकार शेरशाह डोंगरी यांनी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कला महाविद्यालयामधून कलेचे शिक्षण घेतले असून त्यांनी सुरवसे हायस्कुल येथे कलाशिक्षक म्हणून २५ वर्षे सेवा केली. त्यांना चित्रकलेचे आणि आदर्श कलाशिक्षक म्हणून अनेक पुरस्कार मिळाले आहेत. छत्रपती संभाजी नगर, पुणे, अहमदाबाद, बंगळूरू, सोलापूर येथे वैयक्तिक चित्र प्रदर्शने केली आहेत. ते सोलापुरात चित्रकला व सुंदर हस्तांक्षरांचे वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.पु. ना. गाडगीळ अँड सन्स हे नाव व्यवसाय क्षेत्रातील विश्वसनीयता तर आहेच, पण कला आणि कलाकारांना संधी व प्रोत्साहन देणारी कलाप्रिय संस्था म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी साकारलेल्या झपूर्झा आर्ट अँड कल्चर गॅलरी मध्ये चौथ्या चित्र प्रदर्शनाचे आयोजन होत असून या प्रदर्शनाचे शिर्षक 'कलाप्रवास' असे आहे.या प्रदर्शनाला कला रसिकांनी उपस्थित राहून कलाकृतींचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन चित्रकार शेरशाह डोंगरी आणि पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे जितेंद्र जोशी यांनी केले आहे.
Tags:
सोलापूर
