सोलापूर (प्रतिनिधी)- बालाजी अमाईन्सने चिंचोळी एमआयडीसी, सोलापूर येथील आपल्या युनिट-४ प्रकल्पामध्ये डायमिथाईल इथर (डीएमई) उत्पादन प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित केला असून २० मे २०२६ पासून व्यावसायिक उत्पादनास प्रारंभ केला आहे. या यशामुळे व्यावसायिक स्तरावर डीएमईचे उत्पादन करणारी बालाजी अमाईन्स ही भारतातील एकमेव कंपनी ठरली आहे.डीएमई हे एलपीजीमध्ये मिश्रण करून वापरता येणारे स्वच्छ, सुरक्षित व कार्यक्षम पर्यायी इंधन मानले जाते. अनेक पाश्चिमात्य व युरोपीय देशांमध्ये एलपीजीमध्ये २० टक्क्यांपर्यंत डीएमई मिश्रण करून वापर केला जातो. कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दरवर्षी १ लाख मेट्रिक टन उत्पादन क्षमतेचा हा प्रकल्प उभारला असून, आवश्यक मूलभूत अभियांत्रिकी तंत्रज्ञान परदेशी कंपनीकडून प्राप्त करण्यात आले आहे.
ऊर्जा आत्मनिर्भरतेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल
यावेळी बोलताना व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांनी सांगितले की, हा प्रकल्प भारताच्या ऊर्जा आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भारतासाठी डीएमई उत्पादन पूर्णपणे नवीन असल्याने भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) ने नुकताच नवीन भारतीय मानक संहिता प्रसिद्ध केली असून त्यानुसार एलपीजीमध्ये ८ टक्क्यांपर्यंत डीएमई मिश्रणास परवानगी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी डीएमई मिश्रण उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
जागतिक ऊर्जा क्षेत्रातील वाढती अनिश्चितता लक्षात घेता पर्यायी इंधनांचा विकास ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. डीएमईच्या वापरामुळे भारताची एलपीजी आयातीवरील अवलंबित्व कमी होऊन परकीय चलनाची बचत होण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
परवानग्या व मानकांबाबत आव्हाने
भारतामधील हा पहिलाच डीएमई उत्पादन प्रकल्प असल्यामुळे उत्पादन साठवण, हाताळणी, वापर, वाहतूक तसेच रस्ते टँकरद्वारे परिवहन यासंदर्भातील भारतीय मानकांच्या अभावामुळे पेट्रोलियम व स्फोटक सुरक्षा संस्थेच्या परवानग्या आणि इतर वैधानिक मंजुरी मिळविताना कंपनीला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात आले. आंतरराष्ट्रीय मानकांचा संदर्भ घेऊन आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची प्रक्रिया वेळखाऊ ठरल्याचेही स्पष्ट करण्यात आले.प्रारंभी बालाजी अमाईन्स एरोसोल उद्योग तसेच इतर व्यावसायिक क्षेत्रांमध्ये उष्णतेसाठी इंधन म्हणून डीएमईचा पुरवठा करणार आहे.
उद्घाटन समारंभास मान्यवरांची उपस्थिती
या प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभास पूर्णवेळ संचालक एन. राजेश्वर रेड्डी, वरिष्ठ महाव्यवस्थापक गोविंद मंचेकरे तसेच महाव्यवस्थापक विनय दुर्गम उपस्थित होते.
ईव्ही बॅटरी रसायन क्षेत्रातही विस्तार
यावेळी कंपनीच्या भविष्यातील धोरणाबाबत माहिती देताना व्यवस्थापनाने सांगितले की, बालाजी अमाईन्स विद्युत वाहनांच्या बॅटरी रसायन क्षेत्रात वेगाने विस्तार करत आहे. वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी काही विद्यमान प्रकल्पांची पुनर्रचना करून नव्या पिढीतील बॅटरी रसायनांच्या उत्पादनासाठी वापर केला जाणार आहे.
डायमिथाईल कार्बोनेट – इलेक्ट्रॉनिक दर्जा
डीएमसीचा वापर विद्युत वाहनांच्या बॅटरी इलेक्ट्रोलाइटमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. भारतात या रसायनाचे उत्पादन करणारी बालाजी अमाईन्स ही एकमेव कंपनी असून सध्या कंपनीकडे वार्षिक १५ हजार मेट्रिक टन उत्पादन क्षमता उपलब्ध आहे.
एन-मिथाईल पायरोलिडोन – इलेक्ट्रॉनिक दर्जा
एनएमपीचे उत्पादन कंपनी गेल्या दोन दशकांपासून करत असून आता विद्युत वाहन बॅटरी दर्जाचे विद्रावक विकसित करण्यात आले आहेत. देशभर उभारल्या जाणाऱ्या प्रचंड क्षमतेच्या बॅटरी प्रकल्पांना पुरवठा करण्यासाठी कंपनी सज्ज असल्याचे सांगण्यात आले.
डीएमसी आणि एनएमपी या दोन्ही रसायनांचे उत्पादन करणारी बालाजी अमाईन्स ही भारतातील एकमेव कंपनी असून, विशेष रसायन क्षेत्रातील विविध विभागांमध्ये कंपनी अग्रस्थानी असल्याचा दावा व्यवस्थापनाने केला आहे.
Tags:
सोलापूर