अखिल भारतीय औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद यशस्वी ; सोलापूरमध्ये हजारो औषध विक्रेत्यांचा भव्य मूक मोर्चा


सोलापूर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना (AIOCD) यांच्या वतीने बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री, कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अवाजवी सवलत पद्धती तसेच औषध व्यवसायातील अव्यावसायिक स्पर्धेविरोधात दि. २० मे २०२६ रोजी देशव्यापी औषध विक्रेता बंद पुकारण्यात आला होता. या बंदला महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.AIOCD चे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले की, ऑनलाईन औषध विक्रीबाबत अद्याप कायदेशीर स्पष्टता नसताना देशभरात सर्रास औषध विक्री सुरू असून त्यामुळे औषध व्यवसायासह जनतेच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. तसेच कॉर्पोरेट कंपन्यांकडून २० ते ५० टक्क्यांपर्यंत दिल्या जाणाऱ्या सवलतींमुळे छोट्या औषध विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सरकारने ड्रग प्राईस कंट्रोल ऑर्डर (DPCO) २०१३ मधील नफा मर्यादेबाबत फेरविचार करावा तसेच औषध विक्रेत्यांना ब्रँड सबस्टिट्यूशन चा अधिकार द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.राज्य संघटनेचे सचिव अनिल नावंदर यांनी महाराष्ट्रातील बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचे सांगितले. लोकशाही मार्गाने वारंवार निवेदने देऊनही सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने औषध विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या देशव्यापी बंदला पाठिंबा दर्शवत सोलापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या वतीने सोलापूर शहरात भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो औषध विक्रेते आणि केमिस्ट बांधव या मोर्चात सहभागी झाले. मोर्चा चार पुतळा येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालय, पुनम गेट येथे समाप्त झाला.मोर्चादरम्यान ऑनलाईन औषध विक्री, अवाजवी सवलत पद्धती आणि औषध व्यवसायास बाधा आणणाऱ्या धोरणांविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनाला इंडियन मेडिकल असोसिएशन, सोलापूर हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन, एमएसएमआरए तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पाठिंबा दर्शविला.यावेळी जिल्हाध्यक्ष व्यंकटेश पुजारी, जिल्हा सचिव राजेश वीरपे, बसवराज मनोरे, जिल्हा सहसचिव सिद्धेश्वर काळे, मनीष बलदवा, शहराध्यक्ष विलास कारभारी, शहर उपाध्यक्ष श्याम बाहेती, शहर सहसचिव चैतन्य शेळके, शहर खजिनदार हमीद हल्ल्याळ, जिल्हा संघटक सचिव प्रताप कांचन, अनंत चिटकुल, कय्युम इनामदार, राजशेखर बारोळे, राम जोडमोटे, IMA अध्यक्ष डॉ. मंठाळे, हॉस्पिटल असोसिएशन अध्यक्ष डॉ. मस्के तसेच मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह प्रतिनिधी अजित महामुनी उपस्थित होते.उपस्थित पदाधिकाऱ्यांनी औषध विक्रेत्यांच्या विविध समस्यांवर प्रकाश टाकत सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला.



Post a Comment

Previous Post Next Post