सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापूर शहरातील वाढते अवैध धंदे, त्यातून वाढणारे गुन्हे आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सुहास कदम यांच्या वतीने संबंधितांवर चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात यावे यासाठी अन्नत्याग आंदोलनास जिल्हापरिषद पूनम गेट येथे मंगळवार पासून सुरवात करण्यात आले आहे. मागण्यांची व आंदोलनाचा दखल न घेतल्यास सर्वपक्षीय आंदोलन छेडण्याचा तसेच #मुख्यमंत्री_देवेंद्र_फडणवीस ही सोशल मीडिया मोहीम राबविण्याचा इशाराही देण्यात आला आहे.निवेदनात म्हटले आहे की, सोलापूर शहरात डान्स बार, मटका, स्पा पार्लर, अवैध विषारी दारू, शिंदी, वेश्या व्यवसाय, जुगार, सट्टा बाजार तसेच बेकायदेशीर जमिनींचे कब्जे यांसारखे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अवैध व्यवसायांमुळे खून, खुनी हल्ले, जबरी चोरी, घरफोडी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.निवेदनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) बाळासाहेब गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अवैध धंद्यांमधून काळ्या पैशाची वसुली करणे, अवैध धंदे चालविणाऱ्यांना आर्थिक मदत करणे आणि त्यांना संरक्षण देणे, असे आरोप करण्यात आले आहेत. तसेच पूर्वी त्यांच्यावर अवैध वसुलीच्या आरोपांवरून सेवेतून बडतर्फीची कारवाई झाल्याचा उल्लेख करून, राजकीय प्रभावाच्या बळावर पुन्हा त्याच स्वरूपाच्या पदावर नियुक्ती झाल्याचा दावाही करण्यात आला आहे.याशिवाय, बाळासाहेब गायकवाड यांनी मोठ्या प्रमाणात काळा पैसा जमा केल्याचा, तो बांधकाम व्यवसाय व सराफ बाजारात गुंतवल्याचा तसेच आयकर विभागाच्या धाडींचा तपास राजकीय दबावामुळे थांबविण्यात आल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यांच्या चौकशीसंदर्भातील कागदपत्रे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) आणि पोलीस महासंचालक कार्यालयात उपलब्ध असल्याचा दावाही करण्यात आला आहे.तसेच पोलीस हवालदार भागवत शिंदे (ब. नं. एच.सी. १२९५) आणि राजू चव्हाण (ब. नं. ४९७) यांच्यावरही अनेक वर्षांपासून विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अवैध धंद्यांमधून कथित वसुली केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. हे दोघेही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकून कारवाई टाळत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच हे कर्मचारी ड्युटीवर असतानाही गणवेशात दिसत नसल्याचा आणि तक्रार अर्जांमध्ये आर्थिक व्यवहार करून प्रकरणे निकाली काढल्याचाही दावा करण्यात आला आहे.निवेदनात पुढे म्हटले आहे की, यापूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्तांनी अशा कथित वसुली करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची आंतरजिल्हा बदली करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला होता. मात्र, त्यावर पुढील कार्यवाही न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांनी या सर्व आरोपांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सर्वपक्षीय आंदोलन करण्यात येईल तसेच सोशल मीडियावर #मुख्यमंत्री_देवेंद्र_फडणवीस मोहिमेद्वारे सोलापूर शहरातील कथित अवैध धंद्यांचे फोटो व व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात येतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
सोलापूर शहरातील अवैध धंद्यांना पोलीसांचे कथित अभय; संबंधित पोलीस अवैध धंद्याचे वसूलदार असल्याचा आरोप ; चौकशी आणि कारवाईच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन
byदैनिक लोकशाही मतदार
•
0
Tags:
सोलापूर
