सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापुरातील नर्गीस फैजान शेख मृत्यू प्रकरणात मुख्य आरोपी पती मोहम्मद फैजान मोहम्मद जाविद शेख याला अटक करण्यात आली असली, तरी या गुन्ह्यात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या इतर सात आरोपींना अद्याप अटक न झाल्याने नर्गीसच्या कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सर्व आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.तक्रारीनुसार, नर्गीसचा विवाह ७ सप्टेंबर २०२४ रोजी मोहम्मद फैजान शेख याच्यासोबत झाला. विवाहापूर्वी आरोपी तृतीयपंथी असल्याची महत्त्वाची बाब जाणीवपूर्वक लपवून ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. लग्नाच्या पहिल्याच रात्री फैजानने स्वतः "गे" असल्याची माहिती दिली आणि विग काढून दाखविल्याने नर्गीसला मोठा मानसिक धक्का बसल्याचे तक्रारीत नमूद आहे.
ही बाब माहेरच्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर पती व सासरच्या मंडळींकडून नर्गीसला मानसिक छळ, धमक्या आणि जीव मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ती माहेरी राहू लागली. दरम्यान, कौटुंबिक न्यायालयातही प्रकरण गेले. मात्र, नर्गीस सोबत राहण्यास तयार असूनही आरोपी तिला घेऊन जाण्यास तयार नसल्याचा दावाही करण्यात आला आहे.तक्रारीनुसार, १५ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता आरोपी फैजान हा नर्गीसच्या लोकमान्य नगर येथील माहेरी आला. बोलायचे असल्याचे सांगून त्याने नर्गीसची आई व बहिणीला घराबाहेर पाठवले. त्यानंतर घराला आतून कडी लावून स्वतःजवळ आणलेल्या पेट्रोलने नर्गीसला जाळल्याचा आरोप आहे. गंभीर भाजलेल्या नर्गीसचा उपचारादरम्यान २१ एप्रिल २०२६ रोजी मृत्यू झाला.या प्रकरणात पतीसह सासरा, सासू, दोन नणंदा, दिर आणि जाऊ यांनी संगनमत करून फसवणूक व कट रचल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मात्र, अद्याप केवळ मुख्य आरोपीलाच अटक झाल्याने इतर आरोपींनाही तातडीने अटक करून निष्पक्ष आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी नर्गीसच्या कुटुंबातील सायराबानो शेख सना शेख हिना शेख सह आदींनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.
Tags:
सोलापूर