सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापूर शहर गुन्हे शाखेने सराईत आंतरजिल्हा मोटारसायकल चोराला अटक करत विविध जिल्ह्यांतील १४ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईत ६ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून मोटारसायकल चोरीचे एकूण १४ गुन्हे उघडकीस आले आहेत.शहरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार यांनी गुन्हे शाखेला चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे निर्देश दिले होते.वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून संशयिताचा माग काढला. दरम्यान, १२ जुलै रोजी गोपनीय माहितीच्या आधारे हैदराबाद रोडवरील मार्केट यार्ड परिसरात सापळा रचून सत्यवान रामहरी भोसले (वय ३२, रा. पडसाळी, ता. उत्तर सोलापूर) याला चोरीच्या होंडा युनिकॉर्न मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले.चौकशीदरम्यान आरोपीने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, विश्वासात घेतल्यानंतर त्याने वसंत विहार परिसरातून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. आरटीओ नोंदी, इंजिन व चेसिस क्रमांकाची पडताळणी केल्यानंतर संबंधित मोटारसायकल फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले.यानंतर सखोल चौकशीत आरोपीने सोलापूर, धाराशिव, सातारा तसेच कर्नाटक राज्यातूनही मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या माहितीनुसार आणखी १३ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.या कारवाईमुळे सोलापूर शहरातील ७, धाराशिव जिल्ह्यातील ५, सातारा जिल्ह्यातील १ आणि कर्नाटक राज्यातील १ असे एकूण १४ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, सहायक पोलीस आयुक्त दिलीप पवार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या पथकातील विनोद रजपूत, इम्रान जमादार, उमेश पवार, रामा भिंगारे, सुरज पवार, विजयकुमार वाळके, महेश रोकडे, शैलेश बुगड, महेश शिंदे, युवराज गायकवाड, चालक बाळासाहेब काळे, सतीश काटे तसेच सायबर पोलीस ठाण्यातील प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली
