शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; ६.८० लाखांचा एमडी ड्रग्ज जप्त, एकाला अटक

सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापूर शहर गुन्हे शाखेने अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत ६ लाख ८० हजार रुपये किमतीचे ३४ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) अंमली पदार्थ जप्त केले असून, एका आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई छत्रपती संभाजी महाराज पुतळा, जुना पुणा नाका येथील पुलाजवळ करण्यात आली.पोलीस आयुक्त एम. राजकुमार व पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक शहरात अवैध अंमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात गस्त घालत असताना एक संशयित इसम पोलिसांना पाहून पळण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले.झडतीदरम्यान त्याच्याकडील प्लास्टिक पाऊचमध्ये पांढऱ्या रंगाची संशयित पावडर आढळली. पोलीस आयुक्तालयाच्या फॉरेन्सिक पथकाने केलेल्या प्राथमिक रासायनिक तपासणीत ती मेफेड्रोन (एमडी) अंमली पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले.अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रुपेश प्रदीप थडसरे (वय ३४, रा. मित्रनगर, शेळगी, सोलापूर) असे असून, चौकशीत त्याने सोलापूर शहरात विक्रीसाठी एमडी आणल्याची कबुली दिली.या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६१५/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा कलम ८(क), २२(ब) व २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय बनसुडे करीत असून, न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे, पोलीस उपनिरीक्षक मनोज मोरे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Post a Comment

Previous Post Next Post